राज्यात 24 लाख टन साखरेचे उत्पादन | पुढारी

राज्यात 24 लाख टन साखरेचे उत्पादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सद्य:स्थितीत 283 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले असून, 8.38 टक्के सरासरी उतार्‍यानुसार राज्यात 23 लाख 72 हजार टनांइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागाने सर्वाधिक 66.93 टक्क्यांइतके सर्वाधिक ऊस गाळप आणि 57.52 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार करीत आघाडी घेतली आहे, तर कोल्हापूर विभागाने 9.48 टक्क्यांइतका सर्वाधिक उतारा मिळविला आहे. यंदा गाळप हंगामात सुमारे 1 हजार 22 लाख 73 हजार टन ऊस उपलब्ध राहण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

त्यामध्ये 90 टक्के ऊस गाळपास येईल, असे ग्राह्य धरून प्रत्यक्षात 921 लाख टन ऊस गाळपातून 103 लाख 58 हजार टनांइतके साखरेचे उत्पादन हाती येण्याचा अंदाज हंगामपूर्व मंत्री समितीच्या बैठकीत वर्तविण्यात आला होता. दरम्यान, एकूण अपेक्षित ऊस उत्पादनाचा विचार करता सद्यःस्थितीत 27 ते 28 टक्के ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने उशिराने सुरू झाले असले, तरी गाळपाचा वेग वाढला आहे. राज्यात 93 सहकारी व 98 खासगी मिळून एकूण 191 साखर कारखान्यांकडून वेगाने ऊस गाळप सुरू आहे. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता 8 लाख 94 हजार 100 टनांइतकी आहे. गतवर्षी 14 डिसेंबरअखेर 356 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. याचा विचार करता गतवर्षापेक्षा यंदा 73 लाख टनांनी ऊस गाळप कमी झाले आहे.

साखर उत्पादन घटण्याचा अंदाज
राज्यात दुष्काळाची स्थिती असून, पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाळपासाठी अपेक्षेपेक्षा कमी उसाची उपलब्धता राहून साखर उत्पादनही घटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे

Back to top button