लोकसभेतील घुसखोरी चिंताजनक : पंतप्रधान मोदी | पुढारी

लोकसभेतील घुसखोरी चिंताजनक : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेत 13 डिसेंबर रोजी तरुणांनी केलेली घुसखोरी हा विषय चिंताजनक असून यावर वाद-प्रतिवाद करण्यापेक्षा याच्या खोलात जाण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी दैनिकाला त्यांनी याबाबत मुलाखत दिली.

मोदी म्हणाले, संसदेत जे घडले, त्याच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या आहेत. तपास यंत्रणाही कसून तपास करत आहेत. या घुसखोरीमागे कोण आहे, त्यांचा उद्देश काय होता हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या खोलात जावे लागणार आहे. केवळ वाद-प्रतिवाद करण्यात अर्थ नाही.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा याने लोकसभेत तरुणांनी घुसखोरी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच पश्चिम बंगालमधील आपला मित्र सौरव चक्रवर्ती याला हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सांगितले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशातील सर्वात सुरक्षित जागा असलेली संसदच धोक्याच्या छायेत आल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. तसेच आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी, घुसखोर तरुणांना शिफारस पत्र देणारा खासदार विरोधी पक्षाचा असता तर सरकारने त्याला दहशतवादी ठरवले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Back to top button