NDRF : एनडीआरएफची अनन्यसाधारण कामगिरी | पुढारी

NDRF : एनडीआरएफची अनन्यसाधारण कामगिरी

जयंत धुळप

रायगड : गेल्या काही वर्षांत देशांत विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होऊन त्यात, मानवी आणि वित्तीयहानी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, त्याच वेळी या नैसर्गिक आपत्तीअंती बचाव कार्य करून मानवीजीव वाचवण्याकरिता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स(एनडीआरएफ) ची निर्मिती करण्यात आली आणि या विशेष सुरक्षा दलाने देशातील विविध आपत्तींमध्ये अनन्य साधारण कामगिरी सिद्ध करून, गेल्या पाच वर्षांत देशात 40 हजार 429 नागरिकांचे धाडसी रेस्क्यू ऑपरेशन करून प्राण वाचवले आहेत.

देशातील विविध राज्यांतील पुरापत्तीच्या पूर्वानुमानाचा अंदाज घेऊन पूर येण्यापूर्वी आणि पुरात अडकलेल्या अशा तब्बल 2 लाख 52 हजार 723 नागरिकांना जीवदान देण्यात यश मिळविले आहे. या बरोबरच गाय, बैल, बकर्‍या आदी 16 हजार 616 गुराढोरांचे देखील प्राण वाचविले आहेत.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल हे पूर, वादळ, भूकंप, भूस्खलन, इमारत कोसळणे, रेल्वे आणि रस्ते अपघात, रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि न्यूक्लियर आपत्कालीन परिस्थिती, जंगलातील वणवे यांसारख्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जाण्यास सक्षम असलेले बहु-कुशल आणि उच्च विशेषज्ञ दल आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षित आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे तसेच देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपत्ती प्रतिसाद कार्ये पार पाडण्यात अत्यंत सक्षम असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या दरवर्षी नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभाच्या वेळी आणि कोणतीही आपत्ती ओढवण्यापूर्वी संबंधित राज्य सरकारांशी सल्लामसलत करून पूर्व-स्थितीत तैनात केले जातात. जेणे करून आपत्ती बचाव कार्य सुरू करण्यातील विलंब टाळणे शक्य होते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी (एसडीआरएफ) आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाद्वारे राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स (टिओटी), मास्टर ट्रेनर्स (चढ), ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स कॅडर आणि बोअरवेल प्रशिक्षणासह सहा वेगवेगळ्या प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवले जातात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी मूलभूत आणि प्रगत आपत्ती व्यवस्थापन (एमटी) प्रशिक्षण देखील चालवत आहे.

Back to top button