नंदुरबार : लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या मुलाचे अपहरण; ७ संशयितांना अटक | पुढारी

नंदुरबार : लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या मुलाचे अपहरण; ७ संशयितांना अटक

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : लग्नासाठी मुलगी पाहायला आलेल्या मुलाचे अपहरण करुन दहा लाखाची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या अनाहूत प्रकाराने हादरलेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेताच अवघ्या काही तासात पोलिसांनी संबंधितांना बेड्या ठोकत मुलाची सुखरूप सुटका देखील केली. याप्रकरणी संशयित ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणभाई रामजीभाई देसाई (वय २८ वर्ष व्यवसाय मजुरी रा. कृष्णा नगर, सुरत गुजरात) हे दुधाचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतात. नातेवाईक मोहनभाई रबारी (रा. तापी) यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रविभाई (रा. शहादा जि. नंदुरबार) यांच्याशी संपर्क साधून किरणभाई यांना लग्नासाठी मुलगी बघण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार रविभाई (रा. शहादा) यांनी किरणभाई देसाई यांना व्हॉट्सऍपवर काही मुलींचे फोटो दाखविले. यातील एका मुलगीला पाहण्यासाठी किरणभाई देसाई हे प्रकाशा (ता. शहादा) येथे कुटुंबीयांसोबत गेले.

व्हॉट्सऍपवर दाखविलेले स्थळ पाहण्यासाठी किरणभाई शहादा येथे गेले

आज (दि. १८) दुपारी मुलगी पाहण्यासाठी प्रकाशा (ता. शहादा) येथे गेले. तेव्हा व्हॉट्सऍपवर लग्नासाठी दाखविलेल्या स्थळातील मुलींचे फोटो व प्रत्यक्ष दाखविले स्थळ हे वेगळे असल्याचे किरणभाई देसाई यांना लक्षात आले. म्हणून त्यांनी व्हॉट्सऍपवर दाखविलेल्या फोटोतील स्थळाबाबत विचारपूस केली असता त्यांचे दोन दिवसापूर्वीच लग्न जमल्याचे रविभाई यांनी सांगितले. त्यावर  किरणभाई देसाई हे स्थळ बघण्यासाठी नकार देवून घरी जाण्यासाठी निघाले. रविभाई यांनी स्थळ पाहण्यासाठी सोबत आणलेल्या अन्य दोन मुलींना नंदुरबार येथे सोडून देणेबाबत विनंती केली.

किरणभाई यांचे वाहन थांबवून अपहरण

किरणभाई हे घरी जाण्यासाठी निघाले असता नंदुरबार शहराच्या अलीकडे वाहनातील दोन मुलींपैकी एका मुलीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करुन वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन चालकाने वाहन थांबविताच तेथे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील ७ इसम आले व दमदाटी करुन त्यांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेवून गेले. स्थळ पाहण्यासाठी आलेल्या इसमांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले व सुटका करण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करु लागले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वाहन तेथून जात असताना पोलिसांना काहीतरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता संशयीत इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी लागलीच पोलिसांनी पाठलाग करुन ४ इसमांना शिताफीने ताब्यात घेतले व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे आणले.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निलेश गायकवाड यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे सुचनेनुसार सर्व वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेला प्रकार समजावून घेतला. पथक तयार करुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना अटक करुन जबरीने हिसकावून नेलेले मोबाईल व रोख रुपये हस्तगत करून आरोपींवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश केले. देसाई यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३ महिला आरोपी व ४ पुरुष आरोपी असे एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

साईनाथ उदयसिंग ठाकरे (रा. धमडाई ता. जि. नंदुरबार), नितेश वळवी (रा. कोळदा ता. जि. नंदुरबार), रणजित सुभाष ठाकरे (रा. कोळदा ता. जि. नंदुरबार), विशाल शैलेंद्र लहाने (रा. नंदुरबार) अशी पुरुष आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांचेसह स्थानिक गुन्हे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली आहे.

Back to top button