Garba in Navratri 2023: जाणून घ्या; दांडिया, गरब्याचे बदलते रूप | पुढारी

Garba in Navratri 2023: जाणून घ्या; दांडिया, गरब्याचे बदलते रूप

मिथिला शौचे

नवरात्रीमध्ये ठिकठिकाणी रात्री जागरण करून दांडिया आणि गरबा खेळला जातो. गरबा आणि दांडिया ही मूळची राजस्थान आणि गुजरात येथील लोककला आहे. तर रासलीला ही उत्तरेकडची कला आहे. पुराणांमध्ये नवरात्रीमध्ये गरबा, दांडिया खेळण्याचे महत्त्व काय आहे याचा उल्लेख आढळतो. (Garba in Navratri 2023)

माता दुर्गा आणि महिषासुर राक्षसाचे तुंबळ युद्ध होऊन मातेने राक्षसाला ठार केले, त्याचा आनंद म्हणून आणि दुर्गामातेला वंदन म्हणून सगळीकडे दांडिया आणि गरबा खेळला जातो. गरब्यातील हातापायांच्या हालचालींचा संबंध युद्धातील तलवारीचे वार ज्या पद्धतीने झाले त्याच्याशी आहे, असे म्हटले जाते. काही ठिकाणी याला तलवरा नृत्य असेही म्हणतात. राजस्थानमधील काही प्रांतात तर अजूनही तलवार घेऊन हे नृत्य केले जाते. (Garba in Navratri 2023)

नवरात्रीशी संबंधित रासलिला हा शब्दाही ऐकण्यात येतो. हा शब्द श्रीकृष्णाच्या संदर्भात आपण ऐकतो. गोप-गोपींबरोबर आनंदोत्सव साजरा करताना केलेले नृत्य म्हणजे रास होय. त्याला भक्तीचा संदर्भ आहे. या कलेला प्राचीन वारसा असला तरी आजचे त्याचे स्वरूप बरेच बदललेले दिसते. काळानुसार या नृत्यालाही आधुनिक स्वरूप आल्याचे दिसून येते. (Garba in Navratri 2023)

या नऊ दिवसांत उत्साह आणि जल्लोष यांचा भक्तिमय संगम बघायला मिळतो. तरुणाईचा यामध्ये मोठा सहभाग असतो. तसेच ज्येष्ठ व्यक्तीही फेर धरून हे नृत्य करतात आणि देवीला आपला भक्तिभाव अर्पण करतात. मोठमोठ्या मंडळांकडून दांडियाचे आयोजन केले जाते. विविध वाद्यवृंद, गायक यांना आमंत्रित करून जल्लोष केला जातो. गरबा खेळताना विशिष्ट प्रकारची वेशभूषा केली जाते. पारंपरिक चनिया-चोळीसोबतच गरब्याच्या वेशभूषेला आता आधुनिक स्पर्श झालेला दिसतो. पारंपरिक ड्रेसला काही प्रमाणात वेस्टर्न लूक दिला जातो. यामध्ये मेकअप, दागदागिने याला खूपच महत्त्व आले आहे.

या काळामध्ये खास गरबा स्पेशल ज्वेलरी उपलब्ध असते. खासकरून तरुणींमध्ये अशा ज्वेलरीचे प्रचंड आकर्षण दिसून येते. गरबा किंवा दांडियाचा कार्यक्रम रात्री असल्यामुळे चांदी किंवा ऑक्साईड प्लॅटिनममध्ये असलेल्या दागिन्यांची प्रामुख्याने निवड केली जाते. यामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बघायला मिळतात. गळ्याशी बसणारे, लांब आकाराचे असे वेगवेगळे हार दिसतात. यामध्ये बांगड्यांमध्येदेखील कडे, स्टोन जडविलेल्या बांगड्या असे वेगवेगळे प्रकारे दिसतात. घागरा-चोलीवर कंबरपट्टा आवश्यकच असतो. यामध्येही विविध डिझाईन दिसतात. कंबरपट्ट्याबरोबर बाजूबंद तसेच कानातील मोठे झुमके, वेल यांच्यादेखील पारंपरिक दागिन्यांमध्ये समावेश होतो असे म्हणावे लागेल. मोठे घुंगरू लावलेले गोल, त्रिकोणी, चौकोनी आकारातील झुमके घातल्याशिवाय दांडियाची तयारी पूर्ण होत नाही. डोक्यावर बिंदी विशेषत्वाने लावली जाते. मांगटिका म्हणून ही बिंदी प्रसिद्ध आहे. पायामध्ये जाड कडे किंवा जाड साखळीला लावलेले दाट घुंगरू अशा डिझाईनच्या पैंजणांना अधिक मागणी असल्याचे दिसते. असा पेहराव केल्यानंतर मेकअपदेखील तेवढाचा लाजवाब केला जातो.

आकर्षक आणि टिकाऊ मेकअप यावेळी केला जातो. यामध्ये मॅचिंग आयशॅडो, डिझाईनर टिकल्या, नेलपॉलिश, लिपस्टिक यांचा अधिक वापर केला जातो. गरबा किंवा दांडिया रास ही नृत्यकला सगळ्यांनाच येईल असे नसते. खेळता येत नाही पण खेळायची इच्छा आहे अशांसाठी अनेक संस्था याचे प्रशिक्षण वर्गही सुरू करतात. हा नृत्य प्रकार आता परदेशातही लोकप्रिय होऊ लागला आहे. लग्नसमारंभ अशा प्रसंगांनासुद्धा गरबा, दांडिया खेळून जल्लोषाने आनंद साजरा केला जातो. पण, आपला आनंद व्यक्त करताना दुसर्‍यांना त्रास होणार नाही याचीही काळजी आपण घेतली पाहिजे.

Back to top button