

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : जिलेबी म्हटलं की गोडवा, आनंद, मात्र जिलेबी हे एका विदेशी, आक्रमक व जैवविविधतेस हानिकारक अशा माशाचे नाव आहे. सिल्लोड तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या पूर्णा नदीवरील नेवपूर धरण व याच नदीवरील खडकपूर्णा या दोन धरणामध्ये जिलेबी हा मासा आढळत आहे. ही मोठी चिंतेची बाब असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जैवविविधता संवर्धक व अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांना मासे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हा मासा आढळला. त्यांनी नेवपूर धरण येथे मासेमारांसोबत जाऊन या माशाबाबत खात्री केली. हा मासा मूळचा आफ्रिकेतील मोझम्बिया येथील असल्याने याचे शास्त्रीय नाव तीलापिया मोझेम्बीका असे आहे. याला तीलपी व दक्षिण भारतात जीलपी असे म्हटलं जाते व जीलपी चा अपभ्रंश होवुन "जीलेबी' शब्द बनला.
१९५२ मध्ये बंदिस्त जागेत उत्पादन घेतले जावे या अटीच्या एका विशेष कराराद्वारे सदर मत्सबीज देशात आले ते केवळ बंदिस्त जागेत उत्पादन घेतल्या जाण्याच्या अटीवर, मात्र या अटी भंग झाल्या व हा मासा सर्वत्र फोफावला. या प्रजाती बद्दल चिंता करणेच कारण म्हणजे हा मासा अत्यंत खादाड असून तो देशी ,गावरान प्रजातीच्या मास्यांची अंडी खाऊन टाकतो व या स्थानिक मासे प्रजाती आता जवळपास नष्टच झाल्या आहेत. सद्या सर्वच जलाशयात स्थानिक मासे व विदेशी मासे यांचे प्रमाण एकास : दहा असे आहे. सोलापूर मधील उजनी धरणात एकूण मासां पैकी ९० टक्के इतके प्रचंड प्रमाण हे या जिलबीचे प्रमाण आहे. पूर्णा नदीवरील नेवपूर धरणात हा मासा वेगाने वाढत असून पाण्या द्वारे तो मासा आता याच नदीवरील खडकपूर्णा धरणातही प्रचंड प्रमाणात आढळत असून वाढत आहे.
जिलेबी हा मासा स्थानिक जल जैवविविधता नष्ट करत आहे. या माशाला खाद्य मोठ्या प्रमाणात लागते. तसेच याची प्रजनन क्षमता देखील वेगवान गतीने आहे. १०० ग्राम वजनाची मादी मासा आठवड्यात १०० अंडी घालते तर ५०० ग्राम वजनाची मादी १२०० ते १५०० अंडी आठवड्यात घालते. अवघ्या ६ आठवड्यात जिलबी मासे प्रजननक्षम बनतात. जर हे १० मासे पाण्यात सोडले तर दीड महिन्यात ही संख्या १०० होते व याच गतीने या १०० चे पुढील ३ महिन्यात १५ हजार इतकी संख्या होते. हा मासा धरणाच्या वा जलाशयाच्या तळाशी अंडी घालतांना ते पाणी सतत ढवळत असतो यामुळे पाणी नेहमी गढूळ तर बनतेच शिवाय स्थानिक पान वनस्पती चे मूळ मातीतून वेगळे होऊन त्याही नष्ट होतात. या जलवनस्पती वर आधारित सजीव जल सृष्टी ही यायोगे धोक्यात आली आहे. याची बाधा इतर जल जीवांना हो होत आहे. अनेक वनस्पती अशा रीतीने नष्ट होत आहे.
या माशाला नैसर्गिक असा शत्रू नाही व याच्या पिलांच्या बाबत जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तो सर्व पिल्ले तोंडात ओढुन घेतो व त्याचे संरक्षण करतो म्हणून ही त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. याच्या शरीरावर पाठी मागील बाजूस अनीकुचीदार काटे हे शरीरातून निघून त्वचेवर येतात ते असल्याने साप, पक्षी, इतर मत्स्य भक्षक प्राणी याच्या वाट्यास जात नाही. डॉ.संतोष पाटील यांनी केलेल्या संशोधनानुसार ८० ते ८५ फॅरेंनहाइट इतके तापमान त्यास पोषक आहे. आपल्याकडे उन्हाळ्यात इतकेच तापमान जलाशयामध्ये असल्याने तो उन्हाळ्यात ही उत्तम रित्या वाढीस लागते. प्रजनन काळात हा मासा अधिकाधिक वेळ अंडी तोंडात ठेवतो कारण याचे तोंडातील तापमान ५० एफ (फॅरेंनहाईट) इतके असल्याचे संशोधन ही डॉ.संतोष पाटील यांनी केले असून अंडी उबविण्यास ते तापमान योग्य असल्याने अंडी उबविण्याचे प्रमाण इतर मास्यांहून अधिक आहे.
तीलापी – जिलबी ,मांगुर आदी विदेशी आक्रमक, खादाड मास्यांचा स्थानिक जलसाठ्यात मुक्त व वाढलेला वावर, शेतकरी जेव्हा तण व कीटकनाशके फववरतात तेव्हा पावसा सोबत ते शेतातून वाहणाऱ्या पाण्यात मिश्रित होतात व ते पाणी ओढे नाले ते नदी धरण यात पोचून स्थानिक लहान मासे व त्यांची अंडी नष्ट करतात. स्थानिक मासे जुलै ते सप्टेंबर या काळात अंडी घालण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात व योग्य व स्थिर ठिकाणी अंडी घालून प्रजोत्पादन करतात. मात्र यावर्षी सदर दोन महिने नदीस पाणीच नसल्याने सदर प्रजनन विस्कळीत झाले असून ८० टक्क्यांहून अधिक फटका या जैवविविधतेस बसला आहे.
– डॉ.संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक, अभिनव प्रतिष्ठान
मरळ, झिरमोटी, कट्यार, वाम चाल, मूर्ही, डोख, गेर, पाबदा, डेबर,मुरळी, बोराई, आरोळ, भंगणा, खवल, बळो, बोराई, मुरळी, सुरमाई आदी १८ प्रजाती जिल्ह्यात आढळत असून नाजूक व चवदार झिरमोटी आता दिसणे मुश्किल झाले असून खवल, बोराई व आरोळ या जाती जिल्ह्यातुन जवळपास नामशेष झाल्या आहेत. सदर हानिकारक विदेशी प्रजातींचे मास्यांचे येथील जलसाठ्यातुन उच्चाटन करून स्वदेशी मासे विकसित करावे यासाठी डॉ. संतोष पाटील यांनी शासनाला या बाबत अवगत केले असून शासनाकडे पत्राच्या माध्यमातून विदेशी प्रजातींचे मास्यांचे या परिसरातील जलसाठ्यातून उच्चाटन करण्याची मागणी केली आहे.