…अन् मुख्यमंत्री म्हणाले, हे घ्या शंभर रुपये आणि आणा पेढे Marathwada Cabinet meeting | पुढारी

...अन् मुख्यमंत्री म्हणाले, हे घ्या शंभर रुपये आणि आणा पेढे Marathwada Cabinet meeting

Marathwada Cabinet meeting : मराठवाड्यात कॅबिनेट मिटिंग कशा सुरू झाल्या??

छत्रपती संभाजीनगर; उमेश काळे : ही घटना १९७२ ची… मराठवाड्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते. पाहणी दौऱ्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारपरिषदेसाठी ते आले आणि पावसाला प्रारंभ झाला. तेव्हा उपस्थित पत्रकार म्हणाले, पेढे आणा… वसंतरावांनी आपल्या खास नजरेतून पत्रकारांकडे बघितले आणि खिशातून शंभर रुपये काढीत अधिकाऱ्याला दिले व पेढे आणायला सांगितले. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक म्हटल्यावर ही आठवण जुने पत्रकार आवर्जून सांगतात. (Marathwada Cabinet meeting)

संबधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा शिरस्ता वसंतरावांपासून सुरू झाला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (दि.१६) होणाऱ्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेची जुन्या मंडळींत चर्चा आहे. शिंदे सरकारच्या बैठकीवरही दुष्काळाचे सावट असताना शुक्रवारपासून वरुणराजाने लावलेली हजेरी ही लाभदायकच म्हटली पाहिजे. (Marathwada Cabinet meeting)

याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य म्हणाले, की ७२ च्या दुष्काळानंतरच मराठवाड्यातील पाणी आणि शेतीकडे अधिक लक्ष द्यावयास हवे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वसंतरावांनी संभाजीनगरातच वर्षभरातून एक बैठक घेण्याचे ठरविले.

१९८० ते १०८२ या काळात बॅ.अ.र.अंतुले मुख्यमंत्री होते. धडाकेबाज निर्णय घेणारे मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा असणाऱ्या अंतुले यांनी मराठवाड्यासाठी ४२ कलमांची घोषणा केली. या कलमांमध्ये पैठणच्या संतपीठाचा उल्‍लेख नव्हता. त्यावेळी उपस्थित असलेले पत्रकार ज. प. मुळे यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर संतपीठ दिले, अशी घोषणा करीत कलमांमध्येही सुधारणा केली. अर्थात या कलमांवर तेव्हाच्या मराठवाडा दैनिकाने ‘छप्परफाड आश्‍वासने’ असा मथळा दिला. हा मथळा अंतुले यांनाही खूप आवडला आणि त्यांनी मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांना सकाळीच फोन केला. मथळ्यात खोट मारलेली असली तरी दुसऱ्या दिवशीच्या अंकात अनंतरावांनी ‘कल्पवृक्षातळी बांधलिया झोळी’ हा अग्रलेख लिहून मराठवाडा विकासासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्‍त केले. हा अग्रलेखही खूप गाजला. अंतुले यांच्या काळातच सहा जिल्ह्यांचा मराठवाडा आठ जिल्ह्यांचा झाला. लातूर आणि जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती अंतुले यांनी केली, असे वरिष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी सांगितले.

पुढे अंतुले यांचे पद गेल्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कलमात आणखी सुधारणा केल्या. निलंगेकर असताना एक बैठक छत्रपती संभाजीनगरात झाली होती. दुर्दैवाने निलंगेकर फार काळ मुख्यमंत्री राहू शकले नाहीत. निलंगेकरानंतर शंकरराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर त्यांनी कलमांची भाषा आता नाही, असे जाहीर करून टाकले. कालांतराने कलमांची जागा पॅकेजने घेतली हा भाग निराळा.

मराठवाड्यात २०१६ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभजीनगरात बैठक झाली होती. त्यानंतर आताच बैठक होत आहे. विलासराव देशमुख यांच्या काळात २००८ साली बैठक झाली होती. मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक यांनी संभाजीनगरात बैठका घेतल्या होत्या. नाईक यांच्या काळातच शिवसेनेतून छगन भुजबळ व अन्य काही आमदार फुटले होते. तेव्हा बैठकीसाठी भुजबळ संभाजीनगरात आले असता त्यांना सुभेदारी विश्रामगृहाजवळ शिवसेना कार्यकर्त्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते.

…अन् सुधाकरराव निघून गेले Marathwada Cabinet meeting

सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना अवर्षणाचे सावट होते. तेव्हाही ते बैठकीला आल्यावर पावसाला सुरुवात झाली. मंत्रिमंडळ बैठकीचे निर्णय सांगण्यासाठी विभागीय आयुक्‍तालयात पत्रपरिषद ठेवली होती अन् अचानक सुधाकरराव हे मुंबईकडे निघून गेले. ते मुंबईला गेल्याची माहिती अनेक मंत्र्यांनाही नव्हती. तेव्हा त्यांनी पत्रपरिषद घेण्याची जबाबदारी विलासरावांकडे सोपविली. शरद पवार आणि सुधाकररावांच्या राजकीय संघर्षाचे संकेत होते, असे राजकीय निरीक्षक सांगतात.

गोपीनाथरावांचा विराट मोर्चा

सुधाकरराव मुख्यमंत्री असताना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या विरोधात विराट मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आला होता. या मोर्चाचे अटलबिहारी वाजपेयी यांनीही कौतुक केले होते. तद्नंतर ते उपमुख्यमंत्री असताना दलित पँथर व अन्य संघटनांनी विराट मोर्चा काढला. तेव्हा निवेदन स्वीकारण्यासाठी गोपीनाथराव सामोरे गेले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button