

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi Popular Leader : लोकप्रियतेच्या बाबतीत जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच टॉपर आहेत. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, PM मोदी हेच पुन्हा टॉपवर आहेत. लोकप्रियता, मान्यता आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत पीएम मोदी पुन्हा आघाडीवर आहेत. फर्मने हा दावा आपल्या मान्यता रेटिंगच्या आधारे केला आहे. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंग यादीत 76 टक्क्यांसह आपले स्थान कायम ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट हे द्वितीय स्थानावर आहेत. सर्व्हे मॉर्निंग कन्सल्टने म्हटले आहे की नवीनतम मान्यता रेटिंग 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत.
अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टन्सी फर्मने सर्व्हेतील 'ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकर'ने दावा केला आहे की 76 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे, तर 18 टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे आणि सहा टक्के लोकांनी कोणतेही मत दिले नाही.
सर्व्हेच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे की मोदी जगात अव्वलच नाही तर त्यांच्या जवळपास असलेला दुसरा कोणताही नेता नाही. मोदी यांना 76 टक्के लोकांची पसंती आहे. तर मोदी यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेर्सेट 64 टक्के मान्यता रेटिंगसह आणि मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 61 टक्के मान्यता रेटिंगसह आहेत.
संबंधित बातम्या :
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना ४० टक्के, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना ३७ टक्के, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना २७ टक्के आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना २४ टक्के मान्यता मिळाली आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील 'X' वर रेटिंग शेअर केले आणि , "नवीनतम मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षण दाखवते की पंतप्रधान @narendramodi जी यांची लोकप्रियता जागतिक नेत्यांमध्ये अतुलनीय आहे. हे केवळ परराष्ट्र धोरणातील मोदी सिद्धांताच्या यशाचा दाखलाच नाही तर लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात मोदीजींच्या अविचल यशाची, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी निस्वार्थ प्रयत्न आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला अढळ विश्वास याला जागतिक मान्यता आहे." रेटिंगमध्येही मोदींनी अव्वल स्थान पटकावले होते.
लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वलस्थान मिळवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वीच्या दोन्ही सर्व्हेत देखील पहिल्या क्रमांकावर होते. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पीएम मोदी पहिल्या स्थानावर होते. 22 देशांच्या नेत्यांना पराभूत करून त्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले होते. त्यावेळी सर्वेक्षणात पीएम मोदींचे रेटिंग ७६ टक्के होते.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर मोदींचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परिषदेत करण्यात आलेली घोषणा एकमताने स्वीकारण्यात आली. जागतिक मंचावर याचे अनन्य साधारण महत्व आहे. कारण सर्व जागतिक शक्तिंना एकाच पानावर आणणे आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या फूट पाडणाऱ्या मुद्द्यावर एकमत निर्माण करणे ही या घोषणेची प्रमुख भूमिका होती.
शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी, मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांना हे गिव्हल सुपूर्द केले आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी प्रमुख मंचावर केलेल्या सूचना आणि प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये आभासी G20 सत्र आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.
मॉर्निंग कन्सल्टनुसार, पॉलिटिकल इंटेलिजन्स हे त्याचे मालकीचे प्लॅटफॉर्म आहे आणि ते राजकीय निवडणुका, निवडून आलेले अधिकारी आणि मतदानाच्या मुद्द्यांवर रिअल-टाइम मतदान डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20,000 पेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेते.
"सर्व मुलाखती प्रौढांच्या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या नमुन्यांमध्ये ऑनलाइन घेतल्या जातात. भारतात, नमुना साक्षर लोकसंख्येचा प्रतिनिधी आहे, " असे मॉर्निंग कन्सल्टने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.
हे ही वाचा :