छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, भर पावसाळ्यात धावतायेत ९९ टँकर | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, भर पावसाळ्यात धावतायेत ९९ टँकर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :. मान्सूनच्या आगमनानंतर किरकोळ सरीनंतर पाऊस गायब झाला असून जून महिन्यात सरासरी केवळ ७ दिवस पाऊस मराठवाड्यात बरसला आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मात्र चिंतातूर झाला आहे. विभागात वाढत असलेल्या पाणी टंचाईमुळे विभागावर यंदा पुन्हा दुष्काळाचे सावट राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मान्सूनच्या आगमनानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आताच सरासरी पावसाचे गणित बिघडले आहे. संपूर्ण जून महिन्यात ६ जून रोजी २.८ मिलिमीटरचा शिडकावा झाल्यानंतर ११ जून रोजी ५.६ त्यानंतर दोन आठवड्यानंतर २५ रोजी १०.७, २६ रोजी २.८, २७ रोजी ४.२, २८ रोजी १३.४, २९ रोजी ६.३ असा किरकोळ पाऊस झाला.

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुलनेमध्ये कमी पाऊस झाला आहे. विभागात जून ते सप्टेबर या कालावधीत ६७९.५ मिलिमीटर अपेक्षित पाऊस आहे, तर जून महिन्यात १३४ मिलिमीटर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३० दिवसात केवळ ५५.५ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५८.४ टक्के, जालना ४६.१, बीड ४३.२, लातूर ४४.९, धाराशिव २६.५, नांदेड २९.६, परभणी ३८.३ तर हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २६.७ टक्केच पाऊस झाला आहे.

९९ टँकर भागवताय ८५ गावे, २४ वाड्यांची तहान

पावसाच्या विलंबामुळे ऐन पावसाळ्यात चार जिल्ह्यातील ८५ गावे आणि २४ वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. प्रशासनाकडून सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७, जालना ४४, हिंगोली १२ तर नांदेड जिल्ह्यात ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय सरासरी पावसाचे दिवस

जिल्हा सरासरी पावसाचे दिवस

छत्रपती संभाजीनगर – ०७

जालना – ०६

बीड – ०५

लातूर – ०५

धाराशिव – ०५

नांदेड – ०६

परभणी – ०६

हिंगोली – ०५

हेही वाचलंत का?

Back to top button