“महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस”, पवार काका-पुतण्यांच्या बॅनरची पुण्यात जोरदार चर्चा | पुढारी

"महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस", पवार काका-पुतण्यांच्या बॅनरची पुण्यात जोरदार चर्चा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकत्र येतील याची आस लागून राहिली आहे. यापूर्वी पुण्यात कधी भावी मुख्यमंत्री तर कधी भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. यानंतर सध्या पुण्यातील मांजरीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नेत्यांसंदर्भातील बॅनर चांगलेच झळकले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासंदर्भात हे बॅनर लागले आहे.

बारामतीच्या पवार काका-पुतण्यांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यामध्येच कोण रक्ताने पत्र लिहीत, तर कुणी फ्लेक्स लावत मनधरणी करत आहेत. दरम्यान असेच एक फ्लेक्स पुण्यातील मांजरी गावात “लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस ” अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा झाली आहे .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (VSI) बैठकीनिमित्त आज एकत्र येणार होते. त्यावेळी मांजरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय घुले यांनी हे फ्लेक्स लावले आहेत. त्यामध्ये “लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस” या फ्लेक्सची पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button