नाशिक : ग्रामीण भागात आता किर्तनाच्या माध्यमातून शिक्षणजागृती | पुढारी

नाशिक : ग्रामीण भागात आता किर्तनाच्या माध्यमातून शिक्षणजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्या बरोबरचं पालक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणण्याचा पॅटर्न ग्रामिण भागात राबविणे देखील तितकेचं गरजेचे झाल्याने त्यापार्श्वभूमीवर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने ग्रामिण भागात किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. संध्याकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान टिव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा हा डिसले पॅटर्न राज्यभरात राबविण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहे.

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्यासाठी सोलापुर जिल्ह्यातील शिक्षक डिसले यांचा पॅटर्न अमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. आधुनिक युगाशी मोबाईल व टिव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक जोडले गेले असले तरी त्याचे दुष्परिणाम म्हणून कुटूंबातील एकमेकांचा संवाद घटतं आहे. संवाद पुर्ववत करण्यासाठी महापालिकेच्या शाळेत जवळपास ३५ हजार विद्यार्थी व ८३५ शिक्षकांना सांयकाळी सात ते नऊ या वेळेत घरी टीव्ही, मोबाईल न वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळेत पालकांनी टीव्ही, मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचा. यावर केंद्र प्रमुख, शिक्षकांना लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याच्या घरी जावून उपक्रमाची अंमलबजावणी होते की, नाही यासंदर्भात शहानिशा करावी लागतं आहे. शिक्षकांनी उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा ईशारा प्रशासनाधिकारी बी.टी. पाटील यांनी दिला. त्याचबरोबर वाढते दफ्तराचे ओझे लक्षात घेवून महापालिकांच्या शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रम देखील राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी शाळेत दप्तर आणण्याएेवजी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्याच्या सुचना आहेत.

ग्रामिण भागात संवादाची आवश्यकता

ग्रामिण भागात टिव्ही, मोबाईलची क्रेझ शहरी भागापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुर्वीच्या किर्तन, जागरणाची जागा टिव्ही, मोबाईल या अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. या साधनांचा वापर कमी करून कुटूंबात संवाद साधला जावा या हेतून महापालिकेच्या वतीने किर्तनकार संस्थांना आवाहन करून ग्रामिण भागात महापालिकेच्या उपक्रमाचे मार्केटींग करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

Back to top button