Medical education: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ; लोकसभेत माहिती | पुढारी

Medical education: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ; लोकसभेत माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२८ जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी २०१४ पूर्वी ३१ हजार १८५ जागा उपलब्ध होत्या. पंरतु, आता ही संख्या ६७ हजार ८०२ वर पोहोचली आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली असून, २०१४ पुर्वी असलेल्या ३८७ च्या तुलनेत आता ७०४ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, अशी माहिती मांडविया यांनी दिली.

एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील ११० टक्क्यांची वाढ झाल्याचे ते म्हणाले. ५१ हजार ३४८ वरुन ही संख्या १ लाख ७ हजार ९४८ पर्यंत पोहचली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत (सीएसएस) गेल्या पाच वर्षांमध्ये १०१ वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मांडविया म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयांसह सरकारने एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील वाढ केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.

सीएसएस योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये एकूण १५७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यात आसाममधील पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. यातील १०७ महाविद्यालये अगोदरपासूनच कार्यरत असल्याचे मांडविया म्हणाले.

Back to top button