Economic News : अर्थवार्ता | पुढारी

Economic News : अर्थवार्ता

  • गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक आपल्या विक्रमी साप्ताहिक बंदभाव (विकली क्लोज) वर पोहोचले. निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 142.75 अंक व 563.89 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक आजपर्यंतच्या सर्वोच्च साप्ताहिक बंदभाव पातळीवर म्हणजे 19331.8 अंक व 65280.45 अंकांच्या पातळीवर बंद झाले. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 65898.98 अंकांच्या तसेच निफ्टीने 19523.6 अंकांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. सप्ताहाअखेर शुक्रवारच्या सत्रात मात्र गुंतवणूकदारांनी नफा वसुलीस प्राधान्य दिले. शुक्रवारच्या सत्रात निफ्टी 165.50 अंक म्हणजेच 0.85 टक्के व सेन्सेक्स 505.19 अंक म्हणजेच 0.77 टक्के घटला. एकूण सप्ताहाचा विचार करता, सर्वाधिक वाढ दर्शविणार्‍या समभागांमध्ये झी एम्टस्टेन्मेंट (16.24 टक्के), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (8.65 टक्के), हिरो मोटोकॉर्प (8.18 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (7.61 टक्के) या कंपन्यांच्या समभागांचा समावेश होतो. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये आयशर मोटर्स (11.04 टक्के), यूपीएल (3.57 टक्के), अदानी पोर्ट (27.8 टक्के) यांचा समावेश होतो.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज ही प्रमुख कंपनी आपल्याच समूहाची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेचर्सचे समभाग 1362 रुपये प्रतिसमभाग दरावर पुनर्खरेदी करणार. रिलायन्स रिटेलचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे 7.42 ते 7.72 लाख कोटी (90 ते 95 अब्ज डॉलर्स) दरम्यान असल्याचा अंदाज.
  • पीएम गतिशक्ती योजनेसंबंधी निर्णय घेणारी ‘द नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ समितीने 15,683 कोटींच्या पाच नव्या महामार्गांच्या बांधणीस परवानगी दिली. आतापर्यंत ‘द नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ने 5.4 लाख कोटींच्या 85 नव्या महामार्गांच्या बांधणीस परवानगी दिली आहे. 500 कोटींपेक्षा अधिकच्या सर्व महामार्ग निविदांना नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची मंजुरी लागते.
  • इंडियन ऑईल ही सरकारी खनिज तेल उत्पादक व शुद्धीकरण कंपनी रोख्यांच्या माध्यमातून 22 हजार कोटींचा (2.66 अब्ज डॉलर्सचा) निधी उभा करणार. मागील सप्ताहात बीपीसीएल या सरकारी कंपनीनेदेखील 2.19 अब्ज डॉलर्स (सुमारे 18 हजार कोटींचा) निधी उभा करण्याची घोषणा केली होती.
  • अदानी ग्रीन एनर्जी ही अदानी समूहाची कंपनी 12300 कोटींचा निधी उभा करणार. कंपनीच्या संचालक मंडळाकडून क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेमेंट म्हणजेच क्यूआयपीच्या माध्यमातून निधी उभारणीस मान्यता. आता बाजारनियामक संस्था तसेच समभागधारकांकडून मंजुरीची कंपनीस प्रतीक्षा.
  • दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत असलेल्या (इन्सॉल्व्हन्सी प्रोसिडिंग्स) गो एअर वाडिया समूहाच्या कंपनीला सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलासा दिला. प्रॅट अँड व्हिटनी या विमानाचे इंजिन बनवणार्‍या कंपनीने योग्य प्रकारे सेवासुविधा न दिल्याने कंपनीवर (गो एअर) दिवाळखोरीची वेळ आली असल्याचा आरोप वाडिया समूहाने केला. यामुळे 3 मेपासून गो एअरने आपले कामकाज ठप्प केले. आता सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने प्रँट अँड व्हिटनी या अमेरिकेच्या कंपनीला गो एअर या विमान वाहतूक कंपनीला दरमहा पाच इंजिन पुरवल्याचे आदेश दिले आहेत. 1 ऑगस्टपासून 31 डिसेंबरपर्यंत ही इंजिन्स पुरवण्यात येणार आहेत.
  • ‘इंडसिंड’ बँकचे प्रवर्तक बँकेतील आपला हिस्सा 15 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्नशील. ‘इंडसिंड इंटरनॅशनल होल्डिंग्स’ या प्रवर्तकाने यासाठी एकूण 1.5 अब्ज डॉलर्सचा निधी (सुमारे 12,300 कोटी) उभा करण्यास मंजुरी दिली. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीतील कंपनी रिलायन्स कॅपीटलचे अधिग्रहण (अ‍ॅक्विझिशन) करण्यासाठी हा निधी वापरला जाणार.
  • अप्रत्यक्ष कर संकलन विभागाने एकूण 16989 बनावट जीएसटी क्रमांकाची आस्थापने (एनटीटी) शोधून काढली. एकूण सुमारे 15 हजार कोटींची कर चुकवेगिरीची प्रकरणे यामुळे बाहेर आली. बनावट जीएसटी आस्थापने शोधून काढण्याच्या या मोहिमेत 1506 कोटींची अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट रक्कम गोठवण्यात आली. एकूण 59,178 जीएसटी क्रमांक आस्थापनांची या मोहिमेअंतर्गत पुन:पडताळणी करण्यात आली आहे.
  • भारताचा जून महिन्याचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक मागील तीन महिन्यांच्या न्यूनतम पातळीवर. जून महिन्यात भारताचा सेवा क्षेत्र निर्देशांक (सर्व्हिस पीएमआय) 58.5 झाला. मे महिन्यात हा निर्देशांक 61.2 होता. 50 पेक्षा अधिकचा निर्देशांक आकडा संबंधित क्षेत्राची प्रगती/वाढ दर्शवतो.
  • अ‍ॅपल, मॅक्रॉन, फॉक्सकॉन यांसारख्या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सेमीकंडक्टर चीप बनवणार्‍या कंपन्यांनंतर आणि एक अमेरिकेची कंपनी ‘एचपी एन्टरप्राईझेस’ भारतात इंटरनेटसाठी लागणारे सर्व्हिस बनवणार. एकूण 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8000 कोटी) गुंतवणूक भारतात केली जाणार. भारत सरकारने घोषित केलेली ‘उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना – 2’ (पीएलआय स्कीम 2)चा फायदा घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करून भारतात प्रकल्प उभारत आहेत. याचसोबत तैवानच्या चीप बनवणार्‍या कंपन्यांचीदेखील प्रकल्प उभारणीसाठी भारत सरकारशी बोलणी चालू आहे. तैवान जगातील एकूण सेमीकंडक्टर चीपपैकी 70 टक्के चीप्सचे उत्पादन करतो.
  • जिओ कंपनीने 999 रुपयांत मिळणारा 4-जी तंत्रज्ञानावर चालणारा फिचर फोन बाजारात आणला. यासाठी ‘जिओ’ने कार्बन या भारतीय मोबाईल उत्पादक कंपनीशी भागीदारी केली. मायक्रोमॅक्स, लाव्हा या इतर भारतीय उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू. सध्या टू-जी वापणार्‍या ग्राहकांना 4-जीवर आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट 5-जी तंत्रज्ञान जाळे भारतात उभारण्यासाठी दूरसंचार कंपन्यांवर ‘चीन’मधील कंपन्यांची उपकरणे वापरण्यावर बंदी जिओ वगळता इतर दूरसंचार कंपन्यांनी 4-जी तंत्रज्ञानासाठी हुवाई, झेडटीई यांसारख्या चायनीज कंपन्यांची उपकरणे व सेवा वापरली. परंतु 5-जीसाठी भारतीय कंपनी ‘टीसीएस’ने ‘बीएसएनएल’ या सरकारी कंपनीला संबंधित तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. इतर भारतीय दूरसंचार कंपन्यांसाठी ‘टीसीएस’ हा उत्तम पर्याय असू शकतो.
  • फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून एप्रिल 2023 ते मे 2023 अखेरपर्यंत 14 महिन्यांत सवलतीच्या दरातील खनिज तेल रशियाकडून खरेदी करून भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी एकूण 7.17 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 60 हजार कोटींचे) परकीय चलन वाचवले. या चौदा महिन्यांत एकूण 186.45 अब्ज डॉलर्सचे खनिज तेल आयात करण्यात आले. त्यापैकी सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे तेल रशियाकडून घेण्यात आले. सरासरी 79.75 डॉलर प्रती बॅरल दराने रशियाकडून तेल आयात करण्यात आले. प्रत्येक बॅरल हे प्रतिस्पर्ध्यापेक्षा सुमारे 14.5 डॉलर स्वस्त पडले.
  • 30 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.85 अब्ज डॉलर्सनी वधारून 595.05 अब्ज डॉलर्स झाली.

– प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Back to top button