नाशिक : पेठ ग्रामीण रुग्णालय ‘पाण्यात’ | पुढारी

नाशिक : पेठ ग्रामीण रुग्णालय 'पाण्यात'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पहिल्याच पावसाने पेठ ग्रामीण रुग्णालयाची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बाह्यरुग्ण विभाग पाण्याखाली गेल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

पेठ ग्रामीण रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय तसेच नवीन मेडिकल लॅबचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. 8 ते 9 महिन्यांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा फटका रुग्णांसह नातेवाइकांना बसत आहे. पहिल्या पावसात बाह्यरुग्ण विभागासह रुग्णालयात ठिकठिकाणी पाणी साचले. पाण्याच्या डबक्यातून वाट काढणे रुग्णांसह नातेवाइकांना जिकिरीचे झाले होते. त्यातच काही प्रमाणात चिखल साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

निकृष्ट व अर्धवट काम आदींमुळे पेठ ग्रामीण रुग्णालयात पाणी साचले. बांधकाम दिरंगाईचा फटका आदिवासी बांधवांना नाहक सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून तत्काळ दुसऱ्या ठेकेदारामार्फत काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन छेडू. – गणेश गवळी, युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.

पेठ www.pudhari.news
नाशिक : डोमचे अर्धवट काम.

ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही डोम बसविलेला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रुग्णालयातील ओपीडी विभागासह अन्य ठिकाणी पडते. पावसाचे पाणी साचल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ओपीडीसाठी येणाऱ्या आदिवासी रुग्णांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी मंगळवारी (दि.२७) तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदींसमवेत रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय थांबविण्याची मागणी गवळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. स्लॅब टाकून झाला असून, उर्वरित काम मार्गी लावण्याची सूचना संंबंधित ठेकेदाराला दिली आहे. पुन्हा पाणी साचल्यास रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ओपीडी विभागाचे रुग्णालयात अन्यत्र स्थलांतर केले जाईल. – अभिजित नाईक, वैद्यकीय अधीक्षक, पेठ ग्रामीण रुग्णालय.

Back to top button