सातारा : बैल जखमी झाल्यामुळे हत्या; संशयिताला अटक | पुढारी

सातारा : बैल जखमी झाल्यामुळे हत्या; संशयिताला अटक

कुडाळ(सातारा); पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सरताळे येथे सहा दिवसांपूर्वी कुडाळ, पाचवड रस्त्यालगत एका शर्यतीच्या बैलाची हत्या केलेला संशयित आरोपी कुमार प्रकाश पडवळ (वय 28 रा. कुंभारवाडी ता. वाई) याला मेढा पोलिसांनी गजाआड केले. संबंधित बैल एका अपघातात जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला सांभाळायचा कसा या कारणावरुन त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संशयिताने काही दिवसांपूर्वी शर्यतीचा बैल किकवी, ता. भोर, पुणे येथील बैल बाजारातून विकत घेतला. त्यानंतर हा बैल घेवून जात असताना एका वाहनाने बैलाला ठोकरले. या बैलाला त्याने स्वतःच्या पिकअपमधून आणले. सरताळे जवळ निर्जन ठिकाणी झाडाला बांधून त्याची निर्दयपणे हत्या केली. तशी कबुली त्याने मेढा पोलिसांना तपासात दिली.

बैलाची हत्या करून कोणालाही यासंदर्भात थांगपत्ता लागू न देता संशयित आरोपी पसार झाला होता. मेढ्याचे सपोनि अमोल माने यांनी तपासाची सूत्रे गतिमान करत सहा दिवसांच्या आत आरोपी कुमार प्रकाश पडवळ याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली पीक अप (क्रमांक एम एच 11 सीएच 2019) ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे व सहकारी पोलिसांनी तपासात सहकार्य केले.

दरम्यान, जखमी झालेल्या बैलाला सांभाळायचे कसे या विवंचनेतून संशयिताने त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button