भावना गवळी यांना चिकनगुनिया; ईडी चौकशीला राहणार गैरहजर - पुढारी

भावना गवळी यांना चिकनगुनिया; ईडी चौकशीला राहणार गैरहजर

मुंबई, पुढारी ऑनलाईन

ईडी च्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यांना ईडीने दुसरे समन्स बजावले आहे. आता चिकनगुनिया झाल्याने त्या चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.

भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाल्याने त्या आजारी आहेत. त्यांनी चौकशीसाठी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितल्याची माहिती त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे.

गवळी यांच्या ट्रस्टमधील गैरव्यवहारप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांना ईडीने समन्स बजावले होते. पण, अन्य प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगत त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. आजही ईडी चौकशीला हजर राहतात का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याने त्या गैरहजर राहणार आहेत.

खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडी ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा घातला होता. ‘ईडी’ने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली हाेती.

गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान याने मध्यस्थी केली होती. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. हा एकूण घोटाळा १८ कोटी रुपयांचा आहे. शिवाय सात कोटी रुपये रोख रक्कमही चोरीस गेली होती. त्या रक्कमेचाही समावेश आहे. या सर्व चौकशीसाठी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी गवळी या मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना भेट दिली नाहीत. त्यामुळे त्या मागे परतल्या होत्या.

ईडीचे छापे

गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीकडून छापे टाकला हाेता. सुमारे ९ ठिकाणी ही कारवाई करण्‍यात आली हाेती. त्यानंतर गवळी यांच्या महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी गवळी यांचे निकटवर्ती सईद खान याला अटकही करण्यात आली.

हेही वाचलं का? 

Back to top button