Nagpur Flyover Collapse : नागपुरात उड्डाण पुलाचा भाग कोसळला

Nagpur Flyover Collapse : नागपुरात उड्डाण पुलाचा भाग कोसळला

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कळमना बाजार परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेल्या पुलाचा गर्डर मंगळवारी मध्यरात्री कोसळला. यावेळी धडकी भरवणारा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. (Nagpur Flyover Collapse)

रिंग रोडवरील पारडी चौकातून कळमना मार्केटला जाणाऱ्या मार्गावर भरत नगरचौकातील महाकाळकर सभागृहाजवळ पुलाचं काम सुरू आहे. याच पुलाच्या पिलरपासून गर्डर वेगळे झाले आणि खाली कोसळले. नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रिट रोडवर हा भाग कोसळला. दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. (Nagpur Flyover Collapse)

कळमना पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेला गर्डर नऊ प्लेट्सचा असल्याचे समजते. पुलाचा सुमारे ३० मीटरचा भाग पडला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी नी दिलेल्या माहितीनुसार पारडी चौकात जोरदार आवाज झाला. आधी ट्रकचा टायर फुटला असावा, असं वाटलं. मात्र, लगेच लोकांची धावपळ दिसून येताच नागरीकांनी घटनास्थळ गाठले. तसंच लोकांना बाजूला केले.

Back to top button