सोन्याच्या मागणीत २०२२ मध्ये जोरदार वाढ शक्य | पुढारी

सोन्याच्या मागणीत २०२२ मध्ये जोरदार वाढ शक्य

मुंबई : ‘कोविड- 19’शी भारताची झुंज बराच काळ सुरू असल्याने यावर्षी सोन्याची मागणी अपेक्षेपेक्षा कमी असेल. मात्र, आयात दमदार होईल आणि देशभरात हळूहळू निर्बंध शिथिल होत असताना रिटेल मागणी वाढेल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात व्यक्त केला. 2022 मध्ये आर्थिक प्रगती आणि सोन्याच्या वाढीव मागणीमुळे हा काळ दमदार मागणीचा ठरेल, अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास भविष्यात अनिश्चित परिस्थिती उद्भवू शकेल, असेही अनुमान कौन्सिलने व्यक्त केले आहे.

या कौन्सिलने आज ‘द ड्रायव्हर्स ऑफ इंडियन गोल्ड डिमांड’ हा त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. भारतीय सोने बाजारपेठेचा सखोल अभ्यास करणार्‍या श्रृंखलेतील हा पहिलाच अहवाल आहे. अर्थशास्त्रीय पद्धतींवर आधारातील या अहवालात 1990 ते 2020 अशा तीन दशकांचा वार्षिक डेटा अभ्यासण्यात आला.

या अर्थशास्त्रीय विश्लेषणातून असे स्पष्ट होते की भारतातील दीर्घकालीन सोन्याच्या मागणीमागे वाढणारे उत्पन्न हे सर्वात प्रमुख कारण आहे. अर्थव्यवस्थेला भौगोलिक विविधतेची दमदार जोड असल्याने वाढीव उत्पन्नामुळे भारतातील सोन्याची मागणी वाढती राहते. मात्र, घरगुती बचतीचा दर मंदावणे आणि कृषी उत्पन्न कमी होणे अशा लघुकालीन आव्हानांमुळे भारतातील मागणीचा वेग मंदावतो.

सध्या धोरणकर्ते सोन्याच्या मागणीला फक्त आयातीच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यामुळे सध्या धोरणात्मक पातळीवर पाठबळ नसल्याचाही मागणीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, ग्राहकांमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि जागरुकता अधिक वाढावी यासाठी या क्षेत्रातून अधिक प्रयत्न व्हायला हवेत, यावरही या अहवालात भर देण्यात आला आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतातील रिजनल सीईओ सोमसुंदरम पीआर म्हणाले : . घरगुती उत्पन्न, सोन्याच्या किमती, महागाई हे आजघडीला भारतातील गुंतवणूकदारांपुढील महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच मुद्द्यांनी मागील तीन दशकांत भारतातील सोन्याच्या मागणीवर परिणाम केला आहे. हा अहवाल सर्वसमावेशक अर्थशास्त्रीय विश्लेषणावर आधारित आहे. या निष्कर्षांमुळे या क्षेत्राला ठोस पावले उचलण्याच्या अनुषंगाने धोरणे आखणे आणि भविष्यातील शाश्वत मागणीसाठी नवे मार्ग आखणे यात साह्य होईल.

मागणीवर परिणाम करणारे लघुकालीन घटक

महागाई : भारतीय गुंतवणूकदार महागाईवरील तोडगा म्हणून सोन्याकडे वळतात. महागाईमधील प्रत्येक एक टक्का वाढीमागे सोन्याची मागणी 2.6 टक्क्यांनी वाढते.

सोन्याच्या किमतीतील बदल : किमतीतील स्थिर वाढ किंवा घट यामुळे दीर्घकालीन मागणीवर परिणाम होतो. कोणत्याही वर्षात सोन्याच्या किमतीत एक टक्का घट झाल्याने मागणीत 1.2 टक्क्यांची वाढ होते. कर : 2012 पासून आयात शुल्कात वाढ झाल्याने दरवर्षी सोन्याची मागणी 1.2 टक्क्यांनी घटली. अतिरिक्त पाऊस : पावसात 1 टक्का वाढ झाल्याने दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सोन्याच्या मागणीत 0.2 टक्क्यांनी वाढ होते.

सोन्याला साह्यकारी घटक

विश्वास : हॉलमार्किंग अनिवार्य असणे, गोल्ड बार्ससाठी योग्य डिलिव्हरी स्टँडर्ड्स आणि गोल्ड स्पॉट एक्सचेंज यामुळे भारतील सोने बाजारपेठेत प्रचंड परिणाम दिसून येतील आणि यातून ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. शिक्षण आणि जागरुकता : सोने कसे खरेदी करावे हे समजावून सांगणारी सखोल मोहीम आखल्यास अनेक संभाव्य सोने गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळू शकेल, नाविन्य : ऑनलाइन व्यासपीठ, रोबो-अ‍ॅडव्हायझर्स, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आणि ई कॉमर्स यासारख्या डिजिटल साधनांमुळे उपलब्धतेला चालना मिळेल आणि सोनेही इतर गुंतवणूक पर्यायांच्या बरोबरीने येऊ शकेल.

अहवालातील ठळक निष्कर्ष दीर्घकालीन मागणीवर परिणाम करणारे घटक

उत्पन्न : दरडोई राष्ट्रीय उत्पन्नातील प्रत्येक 1 टक्का वाढीमागे सोन्याच्या मागणीत 0.9 टक्के वाढ होते.
सोन्याच्या किमती : रुपयावर आधारित सोन्याच्या किमतीतील प्रत्येक 1 टक्का वाढीमागे मागणी 0.4 टक्क्यांनी घटते. सरकारी कर : आयात शुल्क आणि इतर करांचा दीर्घकालीन मागणीवर परिणाम होतो, मात्र, सोने दागिन्यांच्या स्वरुपात आयात झाले की सोन्याची बिस्किटे आणि नाणी यानुसार परिणाम बदलत असतो.

स्थानिक प्राधान्यक्रम

एकूणातच, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवर दीर्घकालीन घटकांचा परिणाम अधिक असतो तर सोन्याची बिस्किटे आणि नाणी यावर महागाई किंवा कर अशा लघुकालीन घटकांचा तीव्र परिणाम होतो.

ग्रामीण भागात दागिने गुंतवणूक आणि सौंदर्य म्हणून वापरले जातात. तर, शहरी भागांमध्ये गुंतवणुकीचा प्राधान्यक्रमाचा मार्ग म्हणून बिस्किटे आणि नाण्यांचा विचार केला जातो.

Back to top button