भटक्या मांजरांचीही आता नसबंदी, निर्बिजीकरण | पुढारी

भटक्या मांजरांचीही आता नसबंदी, निर्बिजीकरण

छत्रपती संभाजीनगर: संजय देशपांडे : भटक्या श्वानांच्या धर्तीवर आता भटक्या मांजरींची संख्या नियंत्रणात आणून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गरोदर मांजरींचा गर्भपात करण्यास तसेच सहा महिने वयाच्या आतील मांजरींची नसबंदी करण्यास मात्र, मनाई करण्यात आली आहे. राज्यातील महापालिका, नगर पालिका, नगर पंचायतींमध्ये लवकरच या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण केले जाते. याचा परिणाम म्हणून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. याच धर्तीवर भटक्या मांजरींचेही निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी सांगितले.

जन्मदर नियंत्रण समितीकडे जबाबदारी

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी २०१६ या वर्षी सर्व महापालिका, नगर पालिकांत देखरेख समिती व प्राणी जन्मदर नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. याच समित्यांकडे मांजरींच्या निर्बिजीकरण व लसीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाची (एडब्ल्यूबीआय) मान्यता असलेल्या प्राणी जन्मदर नियंत्रण संस्थेची (एबीसी) त्यासाठी मदत घ्यावी लागेल. या संस्थेकडे नसबंदी करण्यासाठी पुरेशी जागा, ऑपरेशन थिएटर, पशु चिकित्सा केंद्र, मांजराची वाहतूक करण्यासाठी वाहन, निवास, शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेण्याबरोबरच नोंदणीकृत पशुवैद्यक असणे गरजेचे आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरात भटक्या मांजरांची संख्या सुमारे ३५ ते ४० हजारांच्या घरात असण्याची शक्यता पेट लव्हर्स असोसिएशनच्या अध्यक्षा बेरिल सांचीस यांनी व्यक्त केली. भटक्या मांजरींची प्रसूती होऊन तिला रक्तस्राव होत असल्याचे अनेक फोन आम्हाला येतात. मात्र, प्रसूती व नसबंदी शस्त्रक्रियेनंतरची काळजी, यासाठी खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यांकडून ५ ते १० हजार रुपये आकारले जातात. नर मांजराच्या नसबंदीसाठी चार हजार, तर मादी मांजराच्या नसबंदीसाठी पाच हजार रुपये लागतात, असेही त्यांनी नमूद केले.

भटक्या मांजरांची संख्या सातत्याने

वाढत आहे. त्यामुळे श्वानांच्या धर्तीवर त्यांची नसबंदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. नसबंदी व शस्त्रक्रियेनंतरच्या देखभालीसाठी खासगी पशुवैद्यक पाच ते दहा हजार रुपये शुल्क आकारतात. सामान्य नागरिक हा खर्च करू शकत नाही. अशा परिस्थितीत प्राणीमित्रांनी या उपक्रमास सहकार्य करण्याची गरज आहे.
– बेरिस सांचीस, अध्यक्षा, पेट लव्हर्स असोसिएशन

Back to top button