Global Millet Conference : ‘श्री अन्न’ भारतात संपूर्ण विकासाचे माध्यम; पंतप्रधानांच्या हस्ते ‘ग्लोबल मिलेट्स संमेलना’चे उद्घाटन | पुढारी

Global Millet Conference : 'श्री अन्न' भारतात संपूर्ण विकासाचे माध्यम; पंतप्रधानांच्या हस्ते 'ग्लोबल मिलेट्स संमेलना'चे उद्घाटन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा, Global Millet Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन इन्स्टिट्यूटच्या (आयएआरआय) परिसरात आयोजित ग्लोबल मिलेट्स संमेलनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी) वर्षानिमित्त एक पोस्टाचे तिकीट आणि विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांनी उत्पादक-ग्राहकांच्या संमेलनासह प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केले. दोन दिवसीय या संमेलनात शंभरहून अधिक देशांचे कृषी मंत्री, भरडधान्य संशोधकांनी सहभाग घेतला आहे.

Global Millet Conference : श्री तिथे समृद्धी

उद्घाटनाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, संकल्पांना सिद्धीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तेवढीच महत्वाची असते. भारताच्या नेतृत्वात जग आज आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरा करीत आहे. भारताच्या आग्रहाखातरच संयुक्त राष्ट्राने २०२३ ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केले होते. ‘श्री अन्न’ केवळ शेती अथवा आहारापूरताच मर्यादीत नाही. देशात ‘श्री’ कुणाच्याही समोर सहजासहजी जोडले जात नाही, हे भारतीय परंपरेची ओळख असलेल्यांना माहिती आहे. जिथे ‘श्री’ असतो तिथे समृद्धी देखील असते तसेच संपूर्णता देखील असते. ‘श्री अन्न’ देखील भारतात संपूर्ण विकासाचे माध्यम बनत असून गाव आणि गरीब देखील त्यात जोडले जात आहेत.

श्री अन्न देशातील सीमांत शेतकऱ्यांच्या समृद्धीचे द्वार, देशातील कोट्यवधी नागरिकांच्या पोषणाचा कर्णधार तसेच देशातील आदिवासी समाजाचा सत्कार आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. कमी पाण्यात अधिक उत्पादन, रसायन मुक्त शेतीचा मोठा आधार तसेच वातावरणीय बदलांच्या आव्हानांचा सामाना करण्याचे सामर्थ्य हे या पिकाचे महत्व आहे.

श्री अन्नाला जागतिक आंदोलन बनवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत. २०१८ मध्ये भरडधान्याला पोषक धान्य घोषित केले होते. शेतकऱ्यांना त्यासाठी आम्ही जागरूक केले आणि बाजारात आवड निर्माण केली. देशातील युवा वर्ग नवनवीन स्टार्टअप घेऊन या क्षेत्रात आले असून त्यांचे प्रयत्न प्रभावित करणारे आहे. हे सर्व भारताची कटिबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.

Global Millet Conference : २.५ कोटी शेतकरी थेट भरडधान्याशी संबंधित

दक्षिण गोलार्ध गरीबांच्या अन्न सुरक्षेसंबंधी चिंतेत आहे. तर, उत्तर गोलार्धात खाणाच्या सवयींशी संबंधी आजार मोठी समस्या बनली आहे. श्री अन्न अशाच प्रत्येक समस्येचे समाधान आहे. भरड धान्याचे उत्पादन घेणे सामान्यत: सोपे असते. यात खर्च बराच कमी होतो. दुसऱ्या पिकांच्या तुलनेत ही पिके लवकरच घेतली जाऊ शकतात. यात पोषणतत्व देखील अधिक असतात आणि त्यांची चव देखील विशिष्ट असते, असे पंतप्रधान म्हणाले.

भरडधान्य आता रोजगाराचे माध्यम देखील बनत आहे. २.५ कोटी शेतकरी थेट भरडधान्याशी संबंधित आहेत. श्री अन्न करीता आमचे मिशन हे सर्व शेतकरी तसेच त्यांच्याशी संबंधीत तंत्राला फायदा पोहोचवेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

कमी पाण्याच्या प्रदेशात श्री अन्न योग्य पर्याय

भारतात बाजरी मुख्यत्वे १२ ते १३ राज्यात उत्पादन घेतले जाते. पंरतु, या राज्यात दर व्यक्तीमागे या धान्याचा घरगुती वापर २ ते ३ किलोग्राम पेक्षा अधिक नव्हते. आज हे प्रमाण वाढून १४ किलोग्रॅम दरमहा झाले आहे. अत्यंत प्रतिकूल वायु परिस्थितीत श्री अन्नाचे उत्पादन घेतले जाते. पाण्याची आवश्यकता ही कमी असते. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणांसाठी हा एक योग्य पर्याय होऊ शकतो, असे मोदी म्हणाले.

Back to top button