वर्षभरात चंद्रपूर परिमंडळात २ कोटी २८ लाखांची वीजचोरी | पुढारी

वर्षभरात चंद्रपूर परिमंडळात २ कोटी २८ लाखांची वीजचोरी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा वीज बिलाच्या थकबाकीने आधीच महावितरण बेजार झाली आहे. त्यात आता विजचोरट्यांनी डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळेच महावितरण वीजचोरट्यांविरोधात ॲक्शनमोडवर आली आहे. वर्षभरात चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत तब्बल 2 कोटी 28 लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. या वीज चोरीप्रकरणात 108 चोरट्यांनी तडजोडीची रक्कम भरण्यास नकार दिल्याने त्‍यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सन 2000 च्या काळात वीजनिर्मिती, वीजपारेषण व वीजवितरण असा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्या काळात सर्वत्र विजेची हानी होत होती. परिणामी, भारनियमन राबवून वीज वितरण करण्यात येत होते. तसेच वीजचोरी, वीजबिलांची वसुली न होणे, वीज यंत्रणांची देखभाल, दुरुस्ती वेळेवर न होणे, वीज पारेषणचे जाळे मजबूत करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे 35 टक्केपेक्षा जास्तपर्यंत पोहोचलेली पारेषण व वितरण हानी अशा सर्व समस्यांना उत्तर म्हणून वीजकायदा 2003 अस्तित्वात आला. सर्वत्र होणारी वीजहानी रोखण्यासाठी देशातील सर्व वीजकंपन्यांचे वीजनिर्मिती, वीजपारेषण व वीजवितरण अशा तीन कंपन्यात त्रिभाजन होवून ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी वीजवितरण कंपन्यांवर जवाबदारी टाकण्यात आली.

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सहा विभाग आहेत. या विभागात महावितरणने वीजचोरीविरुद्ध विविध मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकंदरीत 1 हजार 324 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या चोरट्यांनी एकंदरीत 2 कोटी 28 लाख रुपयांची विजचोरी केल्याचे उघड झाले. त्यात 603 वीजचोर हे आकडेबहाद्दर, 722 वीजग्राहकांनी वीजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजेची चोरी केली आहे. या सर्व विजचोरांनी एकंदरीत 15 लाख २५ हजार २०७ वीजेच्या युनिटसची विजचोरी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 163 आकडा टाकूण वीज चोरणारे, 435 वीजग्राहकांनी वीजेच्या मीटरमध्ये छेडछाड, गडचिरोली जिल्ह्यात 410 आकडा, 283 वीजग्राहकांनी वीजेच्या मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व वीजचोरांविरुद्ध वीजकायदा 2003 च्या कलम 135 व 136 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे.

परंतु, 108 वीजचोरट्यांनी वीजचोरीची व तडजोड रक्क्म भरलेली नाही. त्यामुळे या वीजचोरांविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदविण्यात आले. जिल्ह्यात संध्याकाळी आणि रात्री मुख्यत्वे आकडा टाकून व मीटर बायपास करुन वीजचोरी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने चमू गठीत केला आहे.

हेही वाचा :

Back to top button