नवरात्री वरही मुंबई महापालिकेचे निर्बंध, गरबा खेळण्यास बंदी | पुढारी

नवरात्री वरही मुंबई महापालिकेचे निर्बंध, गरबा खेळण्यास बंदी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाप्रमाणे यंदाच्या नवरात्री वरही मुंबई महापालिकेने निर्बंध घातले असून, गरबा खेळण्यास बंदी असेल. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या देवीच्या मूर्तींना चार फुटाची मर्यादा घालण्यात आली आहे.

जो न्याय गणेशोत्सव मंडळांना तोच नवरात्रोत्सव मंडळांनाही लावताना नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. देवीच्या मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असून, देवीच्या आगमनासाठी मंडळातील अधिकाधिक पाच जण, तर विसर्जनासाठी जास्तीत जास्त 10 जणांना परवानगी असेल.

गरब्यावर बंदी लादताना आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासही पालिकेने बजावले आहे.

महापालिकेच्या नियमावलीनुसार, घरगुती देवीची मुर्ती दोन फूटाहून अधिक उंच असता कामा नये. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे, असेही पालिकेने म्हटले आहे.

कंटेन्टमेंट झोनमध्येच विसर्जन

नवरात्रौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल, तर त्या मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून मुर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे. मनपाच्या नियमावलीनुसार, जर विसर्जनाच्या तारखेच्या दिवशी घरगुती देवीमूर्ती स्थित असलेली इमारत किंवा चाळ जर ‘सिल्ड इमारत’ मध्ये असेल, तर त्यांना देवीची मूर्ती घराबाहेर घेवून जाण्यास परवानगी नसेल. त्या देवीच्या मूर्तीचे विसर्जन बादलीमध्ये किंवा ड्रममध्ये करावे लागेल.

ऑनलाईन दर्शनाचा सल्ला

नवरात्री उत्सव मंडळांनी गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. तसेच देवीच्या मूर्तीच्या दर्शनाची ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये, असे मनपाने सांगितले आहे. तसेच वाहनातील देवीच्या मूर्तीला इजा पोहोचणार नाही, अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेवून जाण्याचा सल्ला दिला आहे. विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीच्या मूर्तीचे दर्शन घेऊ देऊ नये, असेही महापालिकेने बजावले आहे.

Back to top button