फाशी दिल्यानंतर दोराचे काय करतात? | पुढारी

फाशी दिल्यानंतर दोराचे काय करतात?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दुर्मीळ गंभीर गुन्ह्यात फाशीची शिक्षा दिली जाते. मात्र फाशी दिल्यानंतर त्या दोराचे नक्की काय केले जाते, याची माहिती बहुतेकांना नसते. विशेष म्हणजे फाशीसाठी वापरल्या गेलेल्या दोरासंदर्भात अनेक अंधविश्वास प्रचलित आहेत.
ब्रिटनमध्ये १९६५ पासून फाशीवर बंदी आहे. मात्र त्यापूर्वी शिक्षा दिली जात असे तेव्हा तेथील जल्लाद या दोराचे छोटे छोटे तुकडे करून ते विकत असत आणि लोक ते आनंदाने खरेदी करत असत. कारण ब्रिटनमध्ये असा समज होता की, फाशी देण्यासाठी वापरलेल्या दोराचे तुकडे घरात ठेवले किंवा लॉकेटमध्ये घातले तर माणसाचे नशीब फळफळते. फाशी दिलेला दोर जल्लादलाच दिला जात असे. कोलकाता येथील जल्लाद नाटा मल्लीक यानेही फाशीच्या दोराचे तुकडे लॉकेटमध्ये घालून त्याची विक्री करून अमाप पैसा मिळवला होता.

२००४ मध्ये त्याने रेप व मर्डरचा दोषी ठरलेल्या धनंजय चटर्जी याला फासावर लटकवल्यानंतर त्या दोराचे लॉकेट बनवून प्रत्येकी दोन हजार रुपयांना विकले होते. बंगालमध्येही फाशी दोराबाबत ब्रिटनसारखाच समज होता. काही वेळा मात्र असे दोर जाळले जातात. एखाद्या फारच विवादित अथवा दहशतवाद्याला फाशी दिली असेल तर तो दोर मात्र ताबडतोब नष्ट केला जातो, असेही सांगितले जाते.

Back to top button