एकमेकांचे पत्ते कट करण्यासाठी थोरात-पटोले गटांच्या हालचाली | पुढारी

एकमेकांचे पत्ते कट करण्यासाठी थोरात-पटोले गटांच्या हालचाली

मुंबई: नरेश कदम : विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारी देण्याच्या घोळावरून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील दुही चव्हाट्यावर आली असून परस्परांचे पत्ते कट करण्यासाठी थोरात आणि पटोले या दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण या दोघांबाबत निर्णय हायकमाडच्या हाती आहे.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेला घोळ आणि कटशहाचे राजकारण यामुळे थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद आणि पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद डावावर लागले आहे. पटोले हे प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून थोरात आणि पटोले यांच्या सुप्त संघर्ष प्रदेश कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. परंतु प्रथमच या दोघांमधील संघर्ष बाहेर उफाळून आला आहे. यात थोरात यांनी सुरुवातीलाच, आपल्याला पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही, असे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवून पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. तसेच आपला कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देवून दबाव आणला आहे. त्यांना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाना हटवायचे आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आपली बाजू मांडली आहे.

काँग्रेसच्या अनेक आमदारांचा पाठिंबा थोरात यांना आहे. थोरात यांना पाठिंबा देणारे काही आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उंबरठ्यावर उभे होते. पण अखेरच्या क्षणी थोरात यांनी त्यांना काँग्रेसमध्ये ठेवले. त्याचबरोबर विदर्भातील सुनील केदार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत हे पटोले यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आमदारांच्या पाठिंब्याचा विचार केला तर थोरात यांची बाजू वरचढ आहे. मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे नेते कोणाबरोबर आहेत, हेही महत्त्वाचे आहे. या नेत्यांशी बोलून हायकमांडने माहिती घेतली आहे. थोरात यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतली होती. त्यामुळे हायकमाडच्या कानी या गोष्टी पोचल्या आहेत. भाजपला थेट विरोध करण्याचे काम थोरात यांनी केले नाही. ही थोरात यांची कमकुवत बाजू आहे.

दुसरीकडे पटोले यांनी भाजपला अंगावर घेतले. थेट मोदींवर टीका करण्याची धमक दाखविली. याचबरोबर पटोले हे सी. वेणूगोपाल यांच्या खास मर्जीतील आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर वादग्रस्त वक्तव्य करणे ही त्यांची कमकुवत बाजू आहे. काँग्रेस अंतर्गत कलहात प्रभारी एच. के. पाटील यांचीही विकेट जावू शकते. त्यांना प्रदेश काँग्रेस अंतर्गत कलह रोखता आला नाही. हे पाटील यांचे अपयश आहे, अशी चर्चा आहे. थोरात यांचा राजीनामा मंजूर केला तर अशोक चव्हाण यांची वर्णी पक्षनेतेपदावर लागू शकते. पटोले यांना बदलले तर ओबीसी किंवा दलित चेहरा प्रदेशाध्यक्ष पदावर आणला जाईल.

पटोले यांची सुशीलकुमार शिंदे यांनी उघडपणे बाजू घेतली आहे. पटोले हे आम्हा वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन काम करतात, असे प्रशस्तीपत्र शिंदे यांनी दिले आहे. पण अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांना थोरात यांची विकेट गेलेली हवी आहे. त्यांना जुने हिशेब चुकते करायचे आहेत. थोरात हे मुळात विलासराव देशमुख यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. २०१९ ला आघाडीची सत्ता आली तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि महसूल मंत्रिपद ही दोन्ही पदे थोरात यांना मिळाली. तेव्हा अशोक चव्हाण हे महसूल मंत्रिपदासाठी प्रयत्न करत होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नव्हते, यामुळे या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा थोरात यांच्यावर रोष आहे. त्यामुळे थोरात यांच्या विकेटसाठी ते ही प्रयत्नशील आहेत.

Back to top button