पटोलेंसोबत काम करणे शक्य नाही; बाळासाहेब थोरात यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र | पुढारी

पटोलेंसोबत काम करणे शक्य नाही; बाळासाहेब थोरात यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघात भाचा सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने अडचणीत आलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी, आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत काम करू शकत नाही, असे पत्र काँग्रेस हाय कमांड सोनिया गांधी यांना लिहिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचवेळी थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांची माझ्याबाबत कोणतीही नाराजी नाही, तसेच असे कोणतेही पत्र त्यांनी काँग्रेस हाय कमांडला पाठविलेले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे.

सत्यजित तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळत असताना नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामागे भाजप आहे, असा आरोप पटोले यांनी केला होता. तसेच तांबे यांच्या माध्यमातून थोरात यांचाही या बंडाला पाठिंबा होता, अशी तक्रार पटोलेंनी काँग्रेस नेते सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली होती.

थोरात हे आजारी असल्याने निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्यांनी या विषयावर मौन बाळगले. तसेच त्यांनी रविवारी काँग्रेस हाय कमांडला पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. आपण काँग्रेसचे इतकी वर्षे निष्ठेने काम केले. कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. मात्र, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे वातावरण तयार केले. माझी बदनामी केली. यामुळे मी व्यथित आहे. पटोलेंसोबत यापुढे काम करणे मला शक्य नाही, असे थोरातांनी म्हटले आहे.

पत्रच पाठवले नाही; पटोलेंचा दावा

पटोले यांनी असा दावा केला आहे की, थोरात यांनी असे कोणतेही पत्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले नाही. ते म्हणाले, थोरात आमचे नेते आहेत. थोरात यांच्या कथित पत्राबाबत मला काहीही माहीत नाही. याबद्दल त्यांनाच विचारलेले बरे. आम्ही प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करत आहोत, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

पटोलेंना सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा पाठिंबा

तांबे प्रकरणात थोरात यांची कोंडी झाली आहे. सत्यजित तांबे हे थोरातांचे भाचे आहेत. त्यामुळे ते थोरात यांच्या परवानगीशिवाय बंडखोरी करतील काय याचा विचार केला जावा. तांबेंच्या बंडामागे थोरात हेच आहेत. भाजपशी त्यांनी जवळीक साधली आहे, अशी तक्रार पटोले यांनी केली आहे. पटोले यांना अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता काँग्रेस हाय कमांड कोणाची बाजू घेणार, हे पाहावे लागणार आहे.

Back to top button