क्लासच्या सॅकमध्ये पुस्तकांऐवजी आणला कोयता; सातार्‍यातील घटना | पुढारी

क्लासच्या सॅकमध्ये पुस्तकांऐवजी आणला कोयता; सातार्‍यातील घटना

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील दहावीतील मुलांनी कोयत्याचा धाक दाखवण्यासाठी तो क्लासमध्ये नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन संशयितांकडून तो कोयता सॅकमधून जप्त केला. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांनी वेळीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना बुधवारी घडली आहे. दहावीत शिकत असलेल्या काही पोरांची धुसफूस सुरू आहे. खुन्नसने पाहिल्याने सज्जड दम भरण्यासाठी चार ते पाच मुले एकत्र आली. ज्याला दम भरायचा आहे तोही दहावीतला. शाळेच्या आवारात राडा करण्याऐवजी बाहेरचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यासाठी क्लास हे ठिकाण ठरल्यानंतर एकाने सॅकमध्ये क्लाससाठी लागणार्‍या वह्या पुस्तकांऐवजी त्यामध्ये कोयता घेतला. क्लासमध्ये आल्यानंतर कोयत्याने धाक दाखवण्याची तयारी सुरू असतानाच क्लासमध्ये कोयता असल्याचे बिंग फुटले. यामुळे ज्या मुलाने कोयता आणला होता त्याला घाम फुटला. कोयता कोणाला दिसू नये यासाठी इतर त्याच्या चार ते पाच सहकार्‍यांनी कोयत्याची पळवापळवी करण्यासाठी मदत केली. अखेर ही बाब समोर आल्यानंतर याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत गेली.

गुरुवारी दुपारपासून कोयता प्रकरणी संबंधित मुलांची माहिती घेण्यात आली. ती मुले सातार्‍यातील वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत होती. संबंधितांची गचांडी पकडून त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी कोयता आणल्याच्या कृत्याची कबुली दिली. मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना बोलावून मुलांची खरडपट्टी काढण्यात आली.

पालकांनो, मुलांना वेळीच समज द्या…

दै.‘पुढारी’ने अल्पवयीन मुलांमधील वाढत्या गुन्हेगारी विरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 1 जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेसाठी ठिकठिकाणाहून प्रतिसाद मिळू लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी ‘पालकांनो, मुलांचे मोबाईल तपासा,’ हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालक अलर्ट मोडवर आले आहेत. आता शाळेतील मुले, शिक्षक, समाज याबरोबरच स्वत: पालकांनी पुढे येणे अत्यावश्यक बनले आहे. मुलगा, मुलगी भरकटली असेल व ते वेळीच समोर आले असेल त्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी पालकांनी सजग असावेच व प्रसंगी मुलांना रट्टे देण्याचीही भूमिका घ्यावी. वेळीच समज मिळाली नाही तर त्या मुलाचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता बळावली जाणार आहे.

Back to top button