कोल्हापूर : कार्यक्रम अमृतमहोत्सवाचा… चर्चा ‘भोगावती’ अन् झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची ! | पुढारी

कोल्हापूर : कार्यक्रम अमृतमहोत्सवाचा... चर्चा ‘भोगावती’ अन् झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची !

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. एका संघर्षमय वादळाचा सन्मान होत असताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा मुद्दा आणि त्याला आमदार हसन मुश्रीफ यांनी हसत हसत दिलेले उत्तर यामुळे चांगलीच चर्चा रंगली.

याशिवाय मुश्रीफ यांनी हद्दवाढीच्या विरोधातील भूमिका आता 75 व्या वर्षी तरी बदलावी, अशी विनंती केली. या कार्यक्रमात भोगावती कारखान्याचा निघालेला विषय आणि आ. पी. एन. पाटील यांची कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती याचीदेखील चर्चा सुरू होती.
शिवाजी भुकेले यांनी आपल्या भाषणात बापूंना किती दिवस रस्त्यावर ठेवणार? आता तरी निदान त्यांना खुर्ची द्यावी, अशी मागणी केली. याचा संदर्भ देत पवार-पाटील यांनी, असल्या खर्चाची आणि कार्यक्रमाची आपणास सवय नाही. टाकली सतरंजी किंवा घोंगडं की आपली बैठक सुरू, असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी हशा पिकला.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील किस्सा सांगताना म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला मुश्रीफ यांचे फोन येत होते. संपतराव पवार यांचे पुत्र क्रांतिसिंह पाटील यांना निवडणुकीत माघार घेण्यास सांगण्यासाठी. मी सांगण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मी याकडे दुर्लक्ष केले. आमच्याकडे शंभर संस्था नसतानाही क्रांतिसिंह केवळ 175 मतांनी पडला. जर आपण लक्ष घातले असते तर क्रांतिसिंह नक्कीच निवडून आला असता. यावर मुश्रीफ म्हणाले, त्यामुळे तर ही निवडणूक आम्हाला खूप महागात पडली. यावर पाटील म्हणाले, तुमचे रायगडला कोणी नसताना आम्ही तुम्हाला मदत करतो की नाही, त्यामुळे यापुढे आता तुम्ही येथे क्रांतिसिंहला मदत करा.

मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात हद्दवाढीचा विषय काढत पवार-पाटील यांना, बापू, शहराच्या विकासासाठी आता निदान 75 व्या वर्षी तरी हद्दवाढीच्या विरोधातील भूमिका बदलावी. किमान शहरालगत असणार्‍या गावांचा शहरात समावेश करण्यास काय हरकत आहे? शहराला निधी मिळण्यासाठी लोकसंख्येचा निकष आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, असे सांगितले.

संपतरावांना कारखान्याची चिंता !

शेकापचे जयंत पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याचा विषय काढला. या कारखान्याची संपतराव पवार-पाटील यांना चिंता आहे. कारखान्यावर 300 ते 400 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे पाहा जरा, असे आमदार मुश्रीफ यांच्याकडे पाहत पाटील म्हणाले.

Back to top button