
सातारा : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासून महागाईची वरकढीच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. होलसेल दर व किरकोळ विक्री यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे आधी गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या गृहिणींचे या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आता पैसेच शिल्लक राहत नसल्याने त्यांचा त्रागाही वाढला असून, आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ येत आहे. सर्वच गोष्टींमध्ये महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांचे जगणेच अवघड झाले असून, किचन कट्ट्यावर आदळआपट सुरू आहे.
भाकरी, चपातीचा घासही महाग
गेल्या वर्षभरात महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी दरवाढीची फोडणी बसत असल्याने माहिन्याचा जमाखर्चाचा ताळमेळ घालणे मुश्कील झाले आहे. मागील काही महिन्यांपासून गहू, ज्वारी, बाजरीचे दर गगनाला भिडले आहेत. धान्यादी मालामध्ये ३० ते ४० टक्के दरवाढ झाली आहे. खाद्यतेल, किराणा आवाक्याबाहेर गेला आहे. एकीकडे श्रीमंत वर्ग पंचपक्वानाची चव चाखत असला तरी दुसरीकडे गोरगरिबांना केवळ चटणी भाकरीवर गुजराण करण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ कायम असल्याने सर्वसामान्यांसह कष्टकरी वर्गासाठी दरवाढीमुळे भाकरी, चपातीचा घासही महाग झाला आहे.
किराणा आवाक्याबाहेर; गॅस परवडेना
शेवगा, पावटा, ढब्बू दराची शतकी वाटचाल कायम…
मंडईच्या दरात चढ-उतार होतात. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात भाज्याची मुबलक उपलब्धता होती, तेव्हा कवडीमोलाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला. मात्र, शेवगा गेल्या कित्येक महिन्यांपासून १२५ ते १५० रुपयांचा दर अद्यापही कायम आहे. नवीन वर्षारंभापासून महागाईने उसळी घेतली आहे. सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली. हे दर कमी जास्त होत असले तरी पावटा, ढब्बू मिरची, शेवगा आजही १२० ते १३० रुपये किलोने खरेदी करावे लागत आहेत. मासिक बजेट कोलमडल्याने अनेक घरात जेवणाच्या ताटातून या भाज्या गायब होत आहेत. व्यापारी वर्ग शेतकऱ्याचा माल पड्या दरात घेऊन दिवसभर तो चढ्या दरात हातविक्री करत आहेत.
खाद्यतेल दरवाढीचा मोठा फटका
मागील काही महिने कोरोना, त्यानंतर इंधन दरवाढ आणि आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कारण पुढे करून दुकानदारांकडून ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने खाद्यतेलाचे डबे, डाळ, शेंगदाणा किराणा साहित्याच्या किमतीही ५ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळी महागल्या तर कंद व फळभाज्या, पालेभाज्यांचा पर्याय निवडू शकतो. परंतु, खाद्यतेलाशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये झालेल्या दरवाढीने फेब्रुवारी अखेरीस उच्चांक गाठला आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या १५ किलोच्या डब्यासाठी तब्बल २०० ते २५० रुपये जादा मोजावे लागत होते. दरम्यान, दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर काही अंशी खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. सध्याच्या घडीला तेलाचा डबा २२०० च्या आसपास तर एक किलो पिशवीमधील तेलाची किंमत साधारणतः १५० रुपयांच्या घरात आहे.
महागाईमुळे जेवण झालंय बेचव….
होलसेल दरामध्ये किरकोळ वाढ झालेली असताना किरकोळ विक्रीत मात्र भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे दर आकारले जात आहेत. सर्वसामान्यांच्या आहारामध्ये सूर्यफूल व सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. जेवणाची चव ज्या फोडणीवर अवलंबून आहे, त्या तेलाच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला चांगलीच आर्थिक फोडणी बसत आहे. स्वयंपाकाच्या गॅसने हजारी गाठल्याने स्वयंपाकासाठी इंडक्शन, चूल, तसेच गॅस बचतीसाठी प्रेशर कुकर, सौर पेटीचा वापर होत आहे. परंतु, दोन वेळचे जेवणही मूलभूत गरज असून त्याला पर्याय देऊ शकत नाही. या दररोजच्या जेवणाला महागाईची फोडणी बसू लागल्याने जेवन बेचव होऊ लागले आहे.
जुनाच स्टॉक नवीन दरात…
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे महागाईने उसळी घेतल्याचे सांगून विक्रेत्यांकडून दरवाढीचे समर्थन केले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच ते सहा दिवसांत युक्रेन-रशिया युद्धाला सुरुवात झाली असली तरी होलसेलची गोडाऊन महिन्याचा स्टॉक भरत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आयात- निर्यातीचा परिणात लोकल मार्केटवर इतक्या कमी कालावधीत होणे शक्य नाही. परिस्थितीचे भांडवल करुन जुनाच स्टॉक वाढीव दरात विकण्याचे पाप स्थानिक व्यावसायिकांकडून केले जात आहे. उच्च वर्गीयांना त्याचे सोयरसुतक नसले तरी सर्वसामान्य मात्र भरडला जात आहे.
प्रत्येक दिवसाला वाढताहेत किमती
मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव सुरू आहे. महामारीबरोबरच काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यातच मागील आठवड्यापासून दर दिवसाला जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेलाच्या किमतीमध्ये दर वाढ होऊ लागल्याने कष्टकरी वर्गाबरोबरच सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.