बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणास उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार | पुढारी

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणास उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विधान भवनातील तैलचित्र अनावरण सभारंभास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (दि.२३) उपस्थित राहणार नसल्याचे समजते. विधिमंडळात सायंकाळी सहा वाजता तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे, तर याच वेळेत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी सहा वाजता विधिमंडळात अनावरणाचा सोहळा सुरू होणार आहे. मात्र, ठाकरे गटाने याच वेळेत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे सर्व नेते दक्षिण मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांमुळे विधिमंडळातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ठाकरे गटाचे काही मोजके पदाधिकारी विधिमंडळातील कार्यक्रमास हजेरी लावतील त्यानंतर मेळाव्यास जाणार असल्याचे समजते.

शिंदे गटावर केली टीका

दरम्यान, बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. हा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे. स्वतःला मोदींचे लोक म्हणविणाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र, बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण असल्याने आम्ही यावर टीका करणार नाही, असे राऊत म्हणाले.

Back to top button