विधानपरिषदेतून : संयमी केसरकर, उतावीळ पडळकर | पुढारी

विधानपरिषदेतून : संयमी केसरकर, उतावीळ पडळकर

  • चंदन शिरवाळे 

मूळ शिवसेनेत असताना दीपक केसरकर फारसे बोलायचे नाहीत. गुवाहाटीमध्ये गेल्यावर मात्र ते बोलू लागले आहेत. महाराष्ट्रातील जनतेसमोर शिंदे गटाची बाजू ते तासातासाला अत्यंत प्रभावीपणे मांडत होते. साहजिकच, केसरकरांच्या शैलीमुळे या गटाविषयी जनतेच्या मनात निर्माण झालेला समज हळूहळू दूर होत होता. त्यांच्या संयमी आणि मुद्देसूद बोलण्यावर विविध राजकीय पक्षांचे वजनदार नेतेही प्रभावित झाले होते. केसरकरांच्या या संयमी वक्तृत्वाची झलक बुधवारी विधान परिषदेतही पाहण्यास मिळाली.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. त्यांनी केलेल्या लोकोपयोगी आणि धार्मिक कामांची दखल घेऊन राज्य सरकारने या ऐतिहासिक जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ असे नामांतर करण्याची मागणी भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी केली होती. खरे तर यापूर्वीही ही मागणी करण्यात आली होती; पण तिची सध्याची स्थिती अवगत करून घेण्यासाठी पडळकरांनी या मागणीला धार लावली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे फलित त्यांना आपल्या धनगर बांधवांना दाखवायचे होते; पण त्यांच्या या तारांकित प्रश्नाला त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक राम शिंदे व महादेव जानकर यांनी उपप्रश्न विचारून सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. खरे तर पडळकर यांनी ही मागणी केल्यामुळे जानकर यांनी उपप्रश्न विचारून क्रेडिट घेणे अपेक्षित होते; पण जानकर राहिले बाजूला आणि राम शिंदे यांनीच या शहराचे नामांतर कधी करणार, विलंब का होत आहे आदी प्रश्न विचारून पडळकर यांना मागे रेटले. कारण, आता या दोन नेत्यांचे एकमेकांशी पटत नाही. धनगर बांधवांचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यानंतर भाजपने राम शिंदे यांना राजकीय ताकद दिली; पण त्यांना अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. परिणामी, भाजपने पडळकर यांना महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. आता या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाही. त्यामुळे समाजात आपले महत्त्व निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेतून ते शुक्रवारी सभागृहात केसरकर यांच्या दिशेने प्रश्नावर प्रश्न फेकत होते आणि केसरकर झेलत होते. ही फेकाफेकी पाहून महादेव जानकर यांनाही राहावले नाही. त्यांच्या मनातील बुलेट ट्रेन सुटली. मी तर धनगर बांधवांचा मूळ नेता असल्याची भावना निर्माण झालेल्या जानकरांनीही अहमदनगरच्या नामांतरात उडी घेतली. विरोधी बाकावरूनही राष्ट्रवादीचे सदस्य विक्रम काळे आणि सतीश चव्हाण प्रश्न विचारण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे एकाच प्रश्नावर सभागृहात गोंधळ होत असल्याचे पाहन केसरकर यांनी आपला संयमी स्वभाव दाखवत, याप्रकरणी विशेष बैठक घेऊन केंद्र सरकारला स्मरणपत्र पाठविण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. केसरकरांच्या या अनपेक्षित उत्तरामुळे पडळकर, शिंदे आणि जानकर यांना एकमेकांकडे पाहत आसनस्थ व्हावे लागले.

Back to top button