गणेशोत्सव 2022 : मंगलमूर्ती! | पुढारी

गणेशोत्सव 2022 : मंगलमूर्ती!

 कोट्यवधी भक्‍तांच्या हृदयावर अधिराज्य निर्माण केलेल्या मंगलमूर्ती श्रीगणरायाचे आज शुभागमन होत आहे. कोरोनाच्या कृष्णछायेनंतर आता जल्लोषात गणेशोत्सव होत आहे. कोरोनाचे काळे संकट दूर झाले, त्याप्रमाणे विघ्नहर्त्याने ‘संकष्टी पावावे’ ही मनोभावना भक्‍तांच्या अंत:करणात आहे. श्रीगणेश खर्‍या अर्थाने लोकदैवत आहे. कृषी संस्कृतीपासून ज्ञान-विज्ञान, विद्या, कलांचा अधिष्ठाता म्हणून श्रीगणराजाची कीर्ती आहे.

शतकानुशतकांपासून भारतातच नव्हे, तर जपानसह अनेक पौर्वात्य देशांत गजमुखाची मंदिरे आहेत आणि तिथे श्रद्धापूर्वक वक्रतुंडाची पूजा-अर्चा आणि आराधना यांची परंपरा आहे. भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने साजरा होतो. जणू तो धार्मिक लोकोत्सवच होतो. आता अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससह अनेक देशांत गणेशोत्सव थाटाने साजरा होऊ लागला आहे आणि हिंदूंबरोबर तेथील अन्य धर्मीय समाजही या उत्सवात सहभागी होत आहेत. अथर्वशीर्षात श्री अमेयाचे वर्णन त्रिलोकव्यापी केलेले आहे. गणेशोत्सव आणि गणेशपूजन अनेक देशांत होऊ लागल्याने अथर्वशीर्षातील वर्णन सार्थ ठरत आहे. सुखकर्ता, दु:खहर्ता हे गौरीपुत्र गणेशाचे आद्य स्वरूपच आहे.

संसाराच्या धकाधकीत आणि कटकटीत शिवाय आकस्मिक येणार्‍या संकटांनी सर्वसामान्य माणसाला ‘सुख जवापाडे। दु:ख पर्वताएवढे॥’ असाच अनुभव येत असतो. सामान्यच काय पण असामान्यांनाही काही वेळा अशा आपत्ती-विपत्तींचा सामना करावा लागतो. अशावेळी ‘संकटामाझारी रक्षावे’ म्हणून विघ्नहर्त्या विनायकाचेच स्मरण केले जाते. वरद विनायकाच्या प्रार्थनेनेही मिळणारा दिलासा संकटकाळी आशादीप प्रज्वलित करणारा असतो. श्री ओंकाराच्या केवळ चिंतनानेच वार्ता विघ्नाची दूर होईल, हा विश्‍वास भक्‍तांच्या मनी द‍ृढ आहे. त्यामुळेच ‘सुखहर्ता, दु:खहर्ता’ हे श्रीविघ्नराजेंद्राचे रूप सर्वसामान्यांना भावले असेल, तर त्यात काही आश्‍चर्य नाही. महर्षी व्यासांनी महाप्रचंड महाभारताची रचना केली, तेव्हा गणेशाने त्यांचा लेखनिक म्हणून भूमिका बजावली आणि महर्षी व्यासांनी श्‍लोक उच्चारताच त्याचा अर्थ सांगत तो लिहून पूर्ण करण्याची कामगिरी पार पाडीत ‘बुद्धिदाता’ हे आपले नाव गणरायाने सार्थ केल्याची पुराणकथा आहे.

विद्यादाता आणि बुद्धिदाता ही तर श्रीगुणाधीशाची परम वैशिष्ट्ये आहेत. ‘श्रीगणेशाय नम:’ या अक्षरांनीच शिक्षणाचा आजवर प्रारंभ होत आला आहे. चौदा विद्यांचा दाता म्हणून गजाननाचा पुराणांतरी गौरव करण्यात आला आहे. श्रीगजमुख जसा चौदा विद्यांचा दाता आहे, तसा तो चौसष्ठ कलांचाही दाता आहे. कलारंगाचा आविष्कार गणरायाच्या साक्षीनेच होत आला आहे. ‘गणराज रंगी नाचतो’ या काव्यातून श्रीगणपतीचे नृत्यकौशल्य मोठ्या आत्मियतेने प्रकट झालेले आहे. कलेच्या आविष्कारात नटराजाला म्हणजे श्री महादेवाला प्रथम वंदन केले जाते. श्रीकैलासनाथ आणि माता पार्वती यांचा पुत्र म्हणजे वक्रतुंड. अर्थात, पित्याच्या कलेचा वारसा श्रीगणेशाकडे आल्याचे पुराणांतरी कथातून स्पष्ट होते.

श्रीगणरायाचे प्राचीनत्व वेदांमध्ये स्पष्ट झालेले आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवाचा उल्लेख आहे. त्याचा गणपती असाच उल्लेख करण्यात आला आहे आणि गणेशाप्रमाणे त्याच्या हाती असलेल्या शस्त्रास्त्रांचे वर्णन आहे. म्हणजे वेदकाळापासून श्रीगणपतीची आराधना होत आली आहे. गुप्त काळापासून गणेश पूजनाचा सर्वदूर प्रसार झाला आणि त्यापाठोपाठ परदेशातही गणेश महात्म्य पोहोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्य कोणा भारतीय संस्कृतीतील देवतांची परदेशातही प्रसिद्धी झालेली नाही. श्रीओंकाराच्या निमित्ताने भारतीय संस्कृती साता समुद्रापार पोहोचली आहे. गणरायाच्या द्वादश नामात एकदंत म्हणून गणनायकास अभिवादन करण्यात आलेले आहे. एकदंताचा एक दात तुटला, अशी कथा आहे. हा तुटलेला दात म्हणजे नांगराचे प्रतीक असून, गणेश देवता कृषी संस्कृतीशी संबंधित असल्याचे काही विद्वानांचे मत आहे. गणरायाचे वाहन उंदीर आणि मोर असल्याचे पुराणात वर्णन आहे. उंदीर हा शेतातील धान्याचे, पिकाचे किती नुकसान करतो, हे माहीतच आहे. या उंदराचे गणरायाने आपले वाहन बनवले, म्हणजे त्याने उंदरांवर मात केली, त्यांच्या नाशासाठी उपाय योजले, असा या मिथकाचा अर्थ असल्याचे मानले जाते. त्यातूनही श्रीगणेश कृषी संस्कृतीचा पालनकर्ता होता, असा निष्कर्ष निघतो. पुराणांतरी असलेल्या कथाभागाचा अन्वयार्थ याच स्वरूपाचा आहे.

‘गणेश पुराण’, ‘मुदगल पुराण’ ही गणरायाविषयीची महत्त्वाची पुराणे! या पुराणात व अन्य अनेक कथांत गणरायाने किती एक दैत्यांचा संहार केल्याचे वर्णन आहे. दैत्य म्हणजे दुष्प्रवृत्ती. अशा दुष्प्रवृत्तींचा नाश करणारा तो विघ्नविनाशक! सत्प्रवृत्तीचे रक्षण, संवर्धन आणि दुष्प्रवृतीचे मर्दन, ही शिकवण गणरायाच्या अवतारकार्यातून मिळते. म्हणूनच गणनायक गणपती लोकनायक बनला आणि जनसामान्यांच्या हृदयात त्याला अखंड स्थान मिळाले. अन्य कोणा देव-देवतेला प्रथम वंदनाचा सन्मान नाही, तो श्रीगणेशाला आहे.

शुभकार्याला आणि कोणत्याही कार्याला गणरायाचे पूजन हा आपल्या धार्मिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. श्रीगणराय हे लोकदैवत झाल्याने रावापासून रंकापर्यंत आणि समाजाच्या सर्व थरांत श्रीगणरायाविषयी अलोट श्रद्धा आहे. तमाशासारख्या कला प्रकारातही ‘शुभ मंगल चरणी गण नाचला’ असा गण गायला जातो आणि उच्चभ्रू समाजातही गणेश वंदनाशिवाय कार्यारंभ होत नाही. सर्व महाग्रंथांचा प्रारंभ मंगलचरणानेच झालेला आहे. गणेशोत्सवावेळी श्री आगमनाला अफाट गर्दी होते आणि विसर्जन मिरवणुकीत जनसागर उसळतो. सर्व मंगल व्हावे, ही मनीषा मनी धरून भक्‍तगण गणेशोत्सवात सहभागी होत असतात आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा घोष करीत पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा करतात. सर्व विघ्ने दूर व्हावीत, दु:ख, दारिद्य्र दूर व्हावीत, यासाठी भक्‍तजनांचे गणरायाकडे एकच साकडे असते, ‘सकल मती प्रकाशु!’ गणराया सर्वांना चांगली बुद्धी दे! मंगलमूर्तीचे आगमन होत असताना, हाच आर्त भाव सर्वांच्या ठायी असेल.

Back to top button