5 जी मुळे तिमाहीत 6 हजार नव्या नोकर्‍या

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ‘फाईव्ह जी’ची सेवा लवकरच सुरू होत असल्यामुळे त्यांचाशी निगडित किमान 6 हजारांवरील नोकर्‍यांची भर सध्याच्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत पडेल, अशी दूरसंचार क्षेत्राची अपेक्षा आहे. फाईव्ह जी बरोबरच मेट्रो शहरांच्या बाहेरही ब्रॉडबँड सेवेची व्याप्ती वाढण्यावर या कंपन्यांचा भर असल्यामुळेही नोकर्‍या वाढण्याची अधिक शक्यता आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीच्या कालावधीत दूरसंचार क्षेत्रात नोकरी सोडणार्‍यांचे प्रमाण गेल्या सहा तिमाहींच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 8. 87 टक्के होते. जानेवारी ते मार्च तिमाहीत ही टक्केवारी 7. 88 होती, असे टीमलीझच्या अहवालात म्हटले आहे. कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे असमाधानकारक मूल्यमापन आणि बाजारपेठेत नोकरीच्या वाढत्या संधी, ही त्याची मुख्य कारणे सांगितली जातात. नोकरीवर घेण्याच्या इराद्याच्या निकषावर आर्थिक वर्षाच्या 1 जुलैपासून सुरू झालेल्या दुसर्‍या तिमाहीत हे क्षेत्र 84 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर होते, असेही या अहवालाने निदर्शनास आणून दिले आहे. नोकर भरती करण्याचा इरादा (हायरिंग इंटेंट) म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी नोकरभरती करण्याची कंपनीची/या क्षेत्राची योजना. त्यामुळे ज्यावेळी कंपनीचा हायरिंग इंटेंट 65 टक्के आहे, असे म्हटले जाते, त्यावेळी त्याचा अर्थ 65 टक्के कंपन्यांची नोकर भरतीची योजना असते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीपासून नोकरभरतीच्या इराद्याच्या पातळीवर दूरसंचार क्षेत्र हळूहळू सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 च्या तिमाहीत हे प्रमाण 45 टक्के तर जानेवारी ते मार्च तिमाहीत 65 टक्के आणि एप्रिल जून तिमाहीत ते 75 टक्के होते. या निकषावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (98 टक्के) अव्वल स्थानी आणि दूरसंचार क्षेत्राच्या कितीतरी पुढे होते. दूरसंचार क्षेत्र हे या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

पुण्यात एअरटेलचे डिजिटल हब

दूरसंचार कंपन्या नावीन्यपूर्ण बाबींचा शोध घेण्यासाठी, नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी, संभाव्य धोक्यांवर संशोधन करण्यासाठी आणि अभियांत्रिकी कामासाठी बुद्धीमान तंत्रज्ञांची भरती करण्याची शक्यता आहे. सायबर डिफेन्सच्या आधुनिकीकरणाचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम भागात नवीन टेक्नॉलॉजी हब उभारून डिजिटल अभियंता पदाच्या नोकर्‍यांची निर्मिती अपेक्षित आहे, असे टाडे म्हणाले. पारंपरिक दूरसंचार कंपनी ऐवजी डिजिटल सेवा कंपनी काढण्याचा एअरटेलचा प्रयत्न असून त्यासाठी पुण्यात डिजिटल हब स्थापन करण्यात येणार आहे.

Exit mobile version