खेड तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक थंडी, तापाने फणफणले | पुढारी

खेड तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक थंडी, तापाने फणफणले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: पावसाळी वातावरणामुळे ग्रामीण भागात साथीच्या आजारांनी थैमान घातले असुन खेड तालुक्यात अनेक शालेय विद्यार्थी सर्दी, खोकला, थंडी, तापाने आजारी आहेत. बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सध्या अर्ध्याहून अधिक विद्यार्थी गैरहजर आहेत. खासगी शाळांमध्ये सुद्धा आजारी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांच्या सानिध्यात असल्याने शिक्षकांमध्ये सुद्धा या आजाराची लक्षणे असुन याकडे तालुका आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षक, पालकांकडुन होत आहे.

तालुक्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने तसेच सततच्या आर्द्रतेमुळे साथीच्या जंतुचे पोषण होऊन संसर्ग वाढला. ग्रामीण भागात व जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने लहान विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराने जवळ केले. वर्गात एकत्र आल्याने विद्यार्थ्यांमार्फत संसर्ग वाढला. सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्यावर शिक्षक, पालकांनी उपचार केले. अनेक शाळांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी आजारी असल्याचे समोर आले आहे.

या परिस्थितीची माहिती शिक्षकांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभाग तसेच चांडोली ग्रामीण रुग्णालयात दिली; मात्र आठवडा उलटूनही आरोग्य अधिकारी शाळेत आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विभागाच्या या कृतिबाबत पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तालुक्यातील सर्वच शाळांमधील कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थी आजारी आहेत. शाळा आणि गावात आरोग्य विभागाकडुन तपासणी शिबिर घेणे आवश्यक असल्याचे खेड तालुका प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष शांताराम नेहरे यांनी सांगितले.

आमच्याकडे ४१विद्यार्थी आहेत. त्यातील १७ विद्यार्थी थंडी-तापाने आजारी आहेत. तीन लहान विद्यार्थी खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत, तर वर्गातील उर्वरित विद्यार्थी सर्दी, खोकल्याने हैराण आहेत. चांडोली ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसांपुर्वी याबाबत माहिती दिली होती. मात्र इतरत्र कॅम्प सुरू असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षक सुद्धा आजारी आहेत.अशी स्थिती तालुक्यातील बहुतेक ठिकाणी उद्भवली आहे.

                                        -संदीप जाधव, शिक्षक, पांगरी जिल्हा परिषद शाळा

खेड तालुक्यात कोणत्याही साथीच्या आजाराबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या शाळेबाबत शिक्षक, नागरिकांनी माहिती दिल्यास ग्रामीण रुग्णालयामार्फत तातडीने आरोग्य तपासणी करून उपचार केले जातील.

                        – डॉ बळीराम गाढवे, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती खेड

 

Back to top button