मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरलेला नाही, 18 जुलैपर्यंत तोडगा : फडणवीस | पुढारी

मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरलेला नाही, 18 जुलैपर्यंत तोडगा : फडणवीस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मंत्रिपदाबाबत अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कोणताही फॉर्म्युला निश्‍चित झालेला नाही. विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आम्ही यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ. मात्र 18 जुलैला होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळातील एकूण 42 जागांपैकी एक दोन जागा रिक्‍त ठेवून उर्वरित सुमारे 40 जागा भरल्या जातील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्याने मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार आणि कोणाला कोणते खाते मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातही भाजपला किती खाती मिळणार आणि शिंदे गटाकडे किती खाती जाणार याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप खाती वाटप आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्‍चित झालेला नाही, तो आम्ही येत्या काही दिवसांत निश्‍चित करू. पण अधिवेशनापूर्वी सर्व खात्यांना मंत्री द्यावे लागतील. पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी ठरले आहे. या तारखेलाच अधिवेशन घेण्याचा आमचा मानस आहे.

भाजप सत्तेसाठी नाही तर विचारासाठी काम करतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला. हा निर्णय मला माहीत होता. मी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करेपर्यंत देखील माझ्याबरोबर असलेल्या दोन-तीन लोकांना हा विषय माहीत नव्हता. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत चकित झाले, असे सांगतानाच मुख्यमंत्रिपद जाणे हा माझ्यासाठी धक्‍का नव्हता तर खरा धक्‍का हा उपमुख्यमंत्रिपद मिळणे हा होता, असेही त्यांनी सांगितले.

आमदारांपेक्षा सेनेच्या खासदारांमध्ये रोष

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली असली तरी या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या खासदारांमध्ये जास्त रोष आहे. आमदारांप्रमाणेच त्यातील बहुतांश खासदारांनीही राज्यात जे काही चालले आहे, त्यावर नाराजी व्यक्‍त केली होती. तसेच त्यांनीही भाजपसोबत जायला पाहिजे अशीच भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली होती, अशी आपली माहिती आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 2023 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाट येणार असून या लाटेत भाजपबाहेर राहणारे वाहून जातील ही भीतीही अनेकांना असल्याचे ते म्हणाले.

Back to top button