सोलापूर : शिंदे समर्थक होऊ लागले टार्गेट | पुढारी

सोलापूर : शिंदे समर्थक होऊ लागले टार्गेट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नेते राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारले. त्यातून महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले. या बंडामुळे राज्यात शिंदे समर्थक टार्गेट होऊ लागले आहेत. त्याचेच पडसाद सोलापूर जिल्हा शिवसेनेत उमटू लागले आहेत. शिंदे समर्थक असलेले युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्याकडील पदभार काढून बालाजी चौगुले यांच्याकडे दिला आहे. सोलापुरात नुकतीच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका न करता उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीशी आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहोत, असा नारा शिवसैनिकांनी दिला होता. यामध्ये जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना पक्षाने बक्षीस म्हणून त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य पदावर नियुक्ती केली आहे.

समर्थकांना अधिक जवळ करताना दुसरीकडे शिंदे समर्थकांना टार्गेट करण्याचे तंत्र अवलंबले जाऊ लागले आहे. त्याअनुषंगानेच एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे मनीष काळजे यांची जिल्हा युवासेना अधिकारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असणार्‍या अनेक तालुक्याची जबाबदारी काढून ती बालाजी चौगुले या युवा नेत्याकडे देण्यात आली आहे. चौगुले यांच्याकडे सोलापूर संपूर्ण शहर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचेे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे. काळजे-वानकर गटात मागील काही दिवसांपासून खटके उडत होते. त्याचे लोण हाणामारी आणि पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते.

यापूर्वी झालेल्या अनेक कार्यक्रमांत मनीष काळजे यांनी संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले होते. त्यामुळे काळजे यांना एकनाथ शिंदे समर्थक मानले जात होते आणि याचाच फटका काळजे यांना बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी असणार्‍या एकनाथ शिंदे समर्थकांचे काय होणार, याची चर्चा जोरदार रंगली आहे.  शिवसेनेत अनेक ठिकाणी आता दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यातही हे दोन गट स्वतंत्र काम करणार की एकनाथ शिंदे घेतील त्या भूमिकेशी सहमत राहणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

चौगुले यांची नियुक्‍ती तात्पुरत्या काळासाठी
सध्या राज्यातील शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची उचलबांगडी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवा अधिकारी मनिष काळजे यांच्याकडील जबाबदारी काढून बालाजी चौगुले यांच्याकडे देण्यात आली आहे. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी असून चौगुले यांचे काम पाहून पुढे मुदतवाढीचा निर्णय होईल, असे शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी बरडे, वानकर
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि गणेश वानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवून मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. शिवसेनेवरील निष्ठा जपली, त्याचेच हे फळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण जपली आहे. शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे बरडे व वानकर यांनी सांगितले.

Back to top button