…तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही | पुढारी

...तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही परिस्थितीत उजनी धरणाचे पाणी बारामती, इंदापूरला जाऊ देणार नाही. ही योजना रद्द करावी, अन्यथा आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठल-रुक्मिणची पूजा करण्यापासून रोखू, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकरभैया देशमुख यांनी दिला आहे. यामुळे उजनीचे पाण्याने पुन्हा पेट घेतला आहे. उजनीतील पाणी बारामती आणि इंदापूरला नेण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लोकचळवळ उभी करण्याच्या द़ृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने अतुल खुपसे यांनी आता लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर अ‍ॅटमबॉम्ब फोडण्याचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता जनहित संघटनेने दिलेला हा इशारा आंदोलनाची धार तीव्र करणारी आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील-घाटणेकर म्हणाले, आता हा केवळ शेतकर्‍यांचा प्रश्न नाही, तर सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे.त्यामुळे गावोगावी जाऊन आता सर्वच लोकांना याविषयी जागृत करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण या आंदोलनात तन, मन आणि धनानेही सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. जर लोकशाहीमार्गाने सरकार ऐकायला तयार नसेल, तर त्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची तयारी आहे.

प्रभाकर देशमुख म्हणाले, लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मतदारांनी आमदार आणि खासदार निवडून दिले आहेत. मात्र उजनी धरणाचे पाणी पळविण्याचा दिवसाढवळ्या प्रयत्न होत असतानाही मंडळी मूग गिळून गप्प बसत असतील. तर त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकारी नाही. त्यामुळे या लोकांनी आता राजीनामा द्यावा; अन्यथा उजनी धरणाच्या पाणी बचाव संघर्षात सामील व्हावे.

अतुल खुपसे-पाटील म्हणाले, लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आमदार आणि खासदारकी भोगणारे जर लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरत नसतील आणि झोपेचे सोंग घेत असतील, तर त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर आता हलगीनाद आंदोलन करावे लागेल. त्यामुळे वेळीच याची तीव्रता ओळखून या मंडळींनी उजनी धरण पाणी बचाव आंदोलनात सहभागी व्हावे.

प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देऊन शासनाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार ही मंडळी करत आहेत. मात्र त्यांचा डाव आता आम्ही उधळून लाऊ, असा पवित्रा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button