डोंबिवली : दिवा-रोहा ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड ; प्रवाशांचा तब्बल अडीच तास खोळंबा | पुढारी

डोंबिवली : दिवा-रोहा ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड ; प्रवाशांचा तब्बल अडीच तास खोळंबा

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा 
सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी दिवा-रोहा ट्रेनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, तब्बल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा झाला. अखेर अडीच तासाने रेल्वे प्रसाशनाने पर्यायी ट्रेनची व्यवस्था केल्यामुळे प्रवाशी रोह्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाला आहे. दरम्यान,  प्रवाशांचा अडीच तास खोळंबा झाल्याने, दिवा रेल्वे स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिवा ते रोहा जाणारी ट्रेन ८ वाजून ४५ मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटते. ही दररोजची ट्रेन असल्याने रोजचा प्रवास करणारे अनेक प्रवाशी या ट्रेनचा लाभ घेत असतात. ही ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी दिवा रेल्वे स्थानकात थांबते. मात्र रविवारी सकाळी ट्रेन लवकर येऊन सुद्धा ट्रेनची तांत्रिक तपासणी केली नाही. त्यानंतर ट्रेनचे सुटण्याची वेळ लक्षात घेत तांत्रिक तपासणीसाठी रेल्वेकडून कर्मचारी पाठवण्यात आले. यावेळी ट्रेनचा फाटा तुटला असल्याने ही ट्रेन रोह्यापर्यंत प्रवास करू शकत नाही. त्यामुळे ही ट्रेन रद्द करण्यात येत असून प्रवाशांना पर्यायी ट्रेन उपलब्ध करून देत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मात्र तब्बल दोन तास उलटून, गेल्यानंतरही आता ट्रेन यायची काही चिन्ह दिसत नाही, असे प्रवाशांना जाणवले. त्यामुळे तिकिटाचे पैसे परत द्या, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. मात्र त्याला देखील रेल्वे प्रशासन तयार झाले नसल्याने प्रवाशांचा संताप उफाळून आल्याने दिवा स्थानकात गोंधळाचे वातावरण तयार झाले. अखेर कळवा कार शेड मधून गाडी येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही गाडी कळवा कारशेड मधून निघून थेट कल्याणला पोहचली आणि त्यानंतर ती दिव्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना तब्बल ३ तास खोळंबा झाला.

Back to top button