केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात तिने स्वतःच केला युक्तीवाद | पुढारी

केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात तिने स्वतःच केला युक्तीवाद

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणारी अभिनेत्री केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. केतकी चितळे हिने न्यायालयात वकील न घेता स्वतःच युक्तीवाद केलेला आहे. ती म्हणाली की, “सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही का? ही माझी पोस्ट नाही. मी दुसऱ्या एका व्यक्तीची पोस्ट शेअर केली आहे”, असा प्रश्न केतकीने उपस्थित केला.

सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत.

केतकीने कोर्टात म्हणाली, “ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे”, असे कोर्टाला केतकी चितळे हिने सांगितले. केतकीवर आतापर्यंत राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोब तिलाही महाराष्ट्र दौरा घडवून आणणार आहोत, असंही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणाले.

Back to top button