वाईच्या नगराध्यक्षा अपात्र; लाच प्रकरण भोवले : भाजपला धक्का | पुढारी

वाईच्या नगराध्यक्षा अपात्र; लाच प्रकरण भोवले : भाजपला धक्का

वाई; पुढारी वृत्तसेवा : लाच घेतल्याप्रकरणी वाईच्या थेट नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना पदावरून हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला. पुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य होण्यास डॉ. प्रतिभा शिंदे यांना अपात्र ठरवण्यात आल्याचे यासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, या कारवाईने भाजपला धक्का बसला आहे.

भाजपाच्या डॉ. प्रतिभा शिंदे अवघ्या एका मताने थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. मात्र नगराध्यक्षपद भाजपाकडे गेले. सन 2016 पासून डॉ. प्रतिभा शिंदे नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या.

शहरातील शौचालयाच्या बाधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात 14 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पती सुधीर शिंदे यांच्यामार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध 1 जून 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर पालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगर विकास विभागाकडे केली होती.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीने त्यासंदर्भात राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे रिट दाखल करून या संदर्भात त्वरित निर्णय देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याची सुनावणी दि. 20 ऑगस्ट 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर निर्णय प्रलंबित होता. तो बुधवारी नगरविकास विभागाने घेतला.

याबाबतचा आदेश नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्ता तनपुरे यांनी काढला आहे. डॉ. प्रतिभा शिंदे यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असून सहा वर्षे त्यांना कोणत्याही पदासाठीची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वकिलांशी चर्चा करणार : डॉ. शिंदे

मला शासनाच्या आदेशाची प्रत मिळाली असून शासनाकडे सुनावणी झाली होती, परंतु निकाल एवढ्या झटपट लागेल असे वाटत नव्हते, माझ्यासाठी हे अनपेक्षित आहे, मी माझ्या वकिलांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

Back to top button