कोगनोळी : सीमा नाक्यावर शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन | पुढारी

कोगनोळी : सीमा नाक्यावर शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

कोगनोळी; पुढारी वृत्तसेवा : कोगनोळी : येथे दूधगंगा नदीवर कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर आरटीपीसीआर तपासणीसाठी अतिरिक्त तपासणी नाका उभारल्यामुळे सीमाभागातील प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गुरूवारी शिवसेनेतर्फे दूधगंगा नदीवर आंदोलन छेडण्यात आले. सीमेनजीकच्या महाराष्ट्रातील वाहनांना प्रवेश देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यातर्फे आंदोलन छेडण्यात आले. गुरुवारी सकाळी शिवसेनेतर्फे रास्तारोको करून आरटीपीसीआरच्या सक्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेनेतर्फे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांना अडवून ठेवण्यात आले. यावेळी पाेलिस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ वादावादी घडून आली.

शिवसेनेतर्फे ‘कर्नाटक सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगून निषेध व्यक्त केला. वादावादीचे प्रकार घडून येताच महाराष्ट्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

प्रारंभी सकाळी १० वाजता कागल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिक दूधगंगा नदीजवळ आले. सीमा तपासणी नाक्यावर आल्यानंतर रास्तारोको केला. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कर्नाटक शासनाने सीमा तपासणी नाका तवंदी येथे सुरू करावा

यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटक शासनाने दूधगंगा नदीवर चुकीच्या पद्धतीने सीमा तपासणी नाका सुरू केला आहे. कर्नाटकालगत असलेल्या महाराष्ट्रातील करनूर, वंदूर, शेंडूर, सुळकूड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड येथील प्रवाशांना अडविण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत असून कर्नाटक शासनाने सीमा तपासणी नाका तवंदी येथे सुरू करावा. महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांना सोडण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

डीवायएसपी मनोजकुमार नायक यांनी संबंधित प्रवाशांची होणारी गैरसोय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्याबाबत लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, अशोक पाटील, संदीप पाटील, वैभव आडके, बाबासाहेब शेवाळे, दिनकर नगारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र पोलिसांतर्फे डीवायएसपी आर. आर. पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय नाळे, शशिकांत पाटोळे, सहाय्यक दीपक वाकचौरे यांच्यासह पोलीस फौजफाटा तैनात होता.

‘दै. पुढारी’चे विशेष आभार

‘दै. पुढारी’ने सीमाभागातील करनूर, वंदूर, शेंडूर, आजरा या भागातील प्रवाशांच्या गैरसोयीची वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आंदोलकांनी सीमेलगतच्या गावातील प्रवाशांना आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्याची मागणी केली. सीमावासीय नागरिकांनी ‘दै. पुढारी’चे विशेष आभार व्यक्त केले. गुरुवारी दुपारनंतर सीमेलगतच्या प्रवाशांना ओळखपत्र दाखवून सोडण्यात येत होते.

हे ही वाचलं का?

Back to top button