प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार | पुढारी

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी-वाड्रा याच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत. प्रियांका गांधी यांच्याच नेतृत्वाखाली ४०३ जागांवर काँग्रेस लढेल, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे.

तिवारी म्हणाले, ‘लोकांना प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे. येथे पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील.

सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात.’

युती, आघाडीबाबत चर्चाच नाही

समाजवादी किवा अन्य पक्षांशी आघाडीबाबत ते म्हणाले, ‘ उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ४०३ जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे.

समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

छत्तीसगडमध्ये १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर बूथ स्तरावर जोरदार यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही प्रयोग केले जात आहेत.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला गेल्या १५ वर्षांत सर्वच पातळीवर अपयश आले आहे.

२०१९च्‍या लाेकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना हक्काचा अमेठी मतदारसंघही त्यांना राखता आला नाही. स्मृती ईराणी यांनी त्यांचा पराभव केला.

त्यामुळे काँग्रेसला आपल्या जागा राखण्याचे आव्हान तर होतेच शिवाय येथे पुन्हा नव्याने संघटनात्मक रचना करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

नेत्यांना प्रशिक्षण

उत्तर प्रदेशचे १०० हून अधिक अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना बूथ व्यवस्थापनापासून ते काँग्रेसच्या इतिहासापर्यंत माहिती दिली जात आहे.

त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही प्रशिक्षण दिले. रायपूरमधील निरंजन धर्मशाला येथे मास्टर ट्रेनर्सना बूथ व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली.

प्रियांका गांधीही बुधवारी सायंकाळी या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रशिक्षणाची माहिती घेतली.

हे नेते, कार्यकर्ते आता उत्तर प्रदेशातील जिल्हा, विधानसभा आणि ब्लॉक स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील.

Back to top button