सिंधुदुर्गचा बारावी निकाल ९९.६० टक्के | पुढारी

सिंधुदुर्गचा बारावी निकाल ९९.६० टक्के

कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या कोकण विभागीय बोर्डाने मंगळवारी बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल राज्यात सलग दहाव्यांदा सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. यामध्ये सिंधुदुर्गचा 99.60 टक्के, तर रत्नागिरीचा बारावी निकाल 99.92 टक्के लागला आहे. गेली 9 वर्षे सिंधुदुर्गचा निकाल राज्यात अव्वल होता.

यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याने बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्गच्या निकालात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात कणकवली कॉलेजची दिव्या विजय राणे ही 99.16 टक्के गुण मिळवून प्रथम, तर कुडाळ हायस्कूलची शर्वाणी रमाकांत कुलकर्णी ही 99 टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थीनी वाणिज्य शाखेच्या आहेत.

वरवडे आयडीयल ज्यु. कॉलेजचे विज्ञान शाखेचे अनुराग संजय सावळ आणि ऋतुजा दत्ताराम साटम हे विद्यार्थी 98.83 टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. तसेच नवभारत बांदा ज्युनिअर कॉलेजची विज्ञान शाखेची एकता महादेव सावंत-मोर्ये ही (98.50 टक्के) गुण मिळवून जिल्ह्यात चौथी आली आहे.

यावर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मात्र दहावी प्रमाणेच सूत्राचा अवलंब करत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेसाठी सिंधुुदुर्गातून 9 हजार 702 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 9 हजार 664 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले असून मुलांचा निकाल 99.55 टक्के तर मुलींचा निकाल 99.66 टक्के लागला आहे.

तालुकानिहाय विचार करता देवगड, दोडामार्ग या तालुक्यांचे निकाल 100 टक्के लागले आहेत तर कणकवलीचा 99.48 टक्के, कुडाळचा 99.85 टक्के, मालवणचा 99.88 टक्के, सावंतवाडीचा 99.67 टक्के, वैभववाडीचा 99.62 टक्के आणि वेंगुर्ल्यांचा 99.87 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील सर्व कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कोकण बोर्डातून नव्या अभ्यासक्रमासाठी 27 हजार 384 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 27 हजार 332 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत.

पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाल 99.38 टक्के

पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाल 99.38 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 163 पैकी 162 विद्यार्थी उत्‍तीर्ण झालेले आहेत. यामध्ये कणकवली तालुका वगळता सर्व तालुक्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कणकवलीचा निकाल 97.61 टक्के लागला आहे. गेली 9 वर्षे सातत्याने सिंधुदुर्गचा बारावीचा निकाल राज्यात सर्वाधिक होता. मात्र, यावर्षी रत्नागिरीचा निकाल अधिक लागला आहे. कोकण बोर्डाने मात्र यंदाही राज्यात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोकण बोर्डाचा गतवर्षीचा निकाल 95.89 टक्के लागला होता. यामध्ये यावर्षी 3.92 टक्केनी वाढ झाली आहे.

वाणिज्य, व्यवसाय शाखेचा निकाल 100 टक्के

सिंधुदुर्गात विज्ञान शाखेचा निकाल 98.55 टक्के, कला शाखेचा निकाल 100 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 99.97 टक्के तर व्यावसायिक विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

बारावी परीक्षेचा निकाल उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला होता. तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र/सराव परीक्षा, तत्सम परीक्षा मुल्यमापन इ. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या असल्याने/घरी दिल्या जात असल्याने गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुर्नमूल्यांकन या सुविधा या परिक्षेसाठी उपलब्ध असणार नाहीत.

कोकण बोर्डाची एक्स्प्रेस सुपरफास्ट

राज्याचा बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. तर सलग दहाव्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा बारावीचा निकाल सर्वाधिक 99.81 लागला आहे.

नागपूर बोर्डाचा निकाल 99.62 टक्के, औरंगाबात बोर्डाचा निकाल 99.34 टक्के, मुंबई बोर्डाचा 99.79 टक्के, कोल्हापूर बोर्डाचा 99.67 टक्के, अमरावती बोर्डाचा 99.37 टक्के, नाशिक बोर्डाचा 99.61 टक्के, लातूर बोर्डाचा 99.65 टक्के निकाल लागला आहे.

Back to top button