सांगली : खरसुंडी यात्रेला उत्साहात सुरुवात | पुढारी

सांगली : खरसुंडी यात्रेला उत्साहात सुरुवात

खरसुंडी ःपुढारी वृत्तसेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर खरसुंडी येथील सासनकाठी आणि पालखी सोहळा होत आहे. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी गोरज मुहूर्तावर श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा पारंपरिक व शाही थाटात झाला. मुख्य मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मंदिरामध्ये लग्न सोहळ्याच्या निमित्त अश्वारूढ पूजा बांधण्यात आली होती. यावेळी विड्याच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जोगेश्वरी मंदिरात देवीची हत्तीवर आरूढ अशी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी लग्नसोहळ्याचे मानकरी मेटकरी यांचे मंदिरात आगमन झाले.

पाच वाजता पालखीचे मुख्य मंदिरातून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान झाले. यावेळी पालखीच्या पुढे अश्व, पारंपरिक वाद्ये होती. पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात आल्यानंतर धार्मिक विधी होऊन विवाह सोहळा झाला. यावेळी ग्रामजोशी नामदेव पाठक, मोहित पाठक, सागर उपाध्ये यांनी पौराहित्य केले. हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते. या लग्नसोहळ्यानंतर भाविकांना बुधवार, दि. 27 रोजी होणार्‍या सासनकाठी व पालखी सोहळ्याचे वेध लागले आहेत.

हेही वाचलतं का ?

Back to top button