कोल्हापूर : वाढीव मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर? | पुढारी

कोल्हापूर : वाढीव मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर?

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का काहीसा वाढला आहे; पण हा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, हे आजच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 59 टक्के मतदान झाले होते. यावेळी ते 61.19 टक्के झाले आहे. आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले. सुरुवातीला सोपी वाटणारी ही निवडणूक नंतर भाजपनेही प्रतिष्ठेची केली. पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांची नेतेमंडळी प्रचारासाठी कोल्हापुरात दाखल झाली. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली.

भाजपने हिंदुत्वाचे कार्ड काढले.शिवसेना नाराज आहे, शिवसैनिक हिंदुत्व सोडणार नाही, अशी भाषणे करून शिवसैनिकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तिन्ही पक्ष एका बाजूला व भाजप-मित्र पक्ष अशा लढतीत मतदानाचा टक्का मात्र फारसा वाढला नाही. केवळ 61 टक्के मतदान झाल्याने कार्यकत्र्यांमध्ये धागधूग वाढली.

कोणत्या भागातून किती मतदान झाले, यावर आपल्या उमेदवाराला किती मतदान मिळेल, याची आकडेमोड सुरू झाली. मतदान झाल्यानंतर लगेचच भाजपने पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर उत्तरमध्ये कमळ फुलणार असल्याचा दावा केला. तर महाविकास आघाडीने हिंदुत्वाचा अजेंडा चालणार नसून, महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी होतील, असे सांगितले. त्यामुळे मतांचा टक्का विचारात घेता विजयी माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

Back to top button