करुणा शर्मा कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविणार | पुढारी

करुणा शर्मा कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविणार

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या शिव शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.

करूणा शर्मा यांनीच ‘शिव शक्ती पक्ष’ हा पक्ष स्थापन केलेला आहे. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर मंथन झाले. अखेरीस करूणा शर्मा यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्ष स्थापन केल्यानंतर थेट विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्यामुळे करूणा शर्मा आणि त्यांच्या पक्षाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

काॅंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. महिनाभरापूर्वीच करुणा शर्मा या कोल्हापुरात दाखल झालेल्या होत्या. तेव्हा त्यांनी कोल्हापुरातील ही पोटनिवडणूक कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती घेतली होती. तसेच आपल्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहण्यास कोणी इच्छूक आहे का? हेदेखील तपासले होते. शेवटी त्यांनी स्वतः कोल्हापुरातून पोटनिवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

करुणा शर्मा यांनी म्हणाल्या होत्या की, “या पोटनिवडणुकीत कोणी रिंगणात उतरण्यास तयार नसेल तर मी स्वतःच या निवडणुकीच्या रिंगणात उतरेन.” यावरून राजकीय वर्तुळात असा सूर उमटला की, त्या स्वतः निवडणुकीत उतरत आहे, याचाच अर्थ त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीत उभे राहण्यास कोणीही इच्छूक नसल्यामुळे त्या स्वतःच निवडणुकीत उतरल्या आहेत.

करुणा शर्मा म्हणाल्या की, “मी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभी आहे. महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने चर्चा सुरू होती. परंतु, भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केल्यामुळे बिनविरोधची चर्चा हळूहळू मागे पडत गेली. काँग्रेसच्या वतीने कै. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी, असे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button