सहा पर्यटक घेणार अंतराळ डिनरचा स्वाद; एका तिकिटाला मोजावे लागणार 4.10 कोटी | पुढारी

सहा पर्यटक घेणार अंतराळ डिनरचा स्वाद; एका तिकिटाला मोजावे लागणार 4.10 कोटी

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन अंतराळ पर्यटन कंपनी व्हीआयपी लवकरच अंतराळ डिनरचा स्वाद देणार आहे. यासाठी कंपनीने सहा तासांच्या हायटेक अंतराळ बलून यात्रेसाठी नेदरलँडच्या रसमस मंक या शेफची निवड केली. या अंतराळ पर्यटनासाठी सहा जणांची निवड केली जाणार आहे, जे पृथ्वीच्या वायुमंडळाच्या वरच्या भागात डिनर करतील. या यात्रेसाठी एक तिकिटाची किंमत सुमारे 4.10 कोटी रुपये इतकी आहे.

ही यात्रा पुढील वर्षी होणार आहे. यासाठी व्हीआयपी कंपनी स्पेसशिप नेपच्यूनचा वापर करणार आहे. हे शिप फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल. हा अंतराळ बलून समुद्रसपाटीपासून 1 लाख फूट उंचीवर पोहोचल्यानंतर सहा अंतराळ पर्यटकांनी वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून ते सोशल मीडियावर यात्रेचे थेट प्रक्षेपण करू शकतील, तसेच पर्यटक मित्र आणि नातेवाईकांशी या माध्यमातून जोडले जाऊ शकतील. इतकेच नाही, तर पर्यटकांनी पृथ्वीवरील वक्रतेवर सूर्योदय पाहण्याची संधीही मिळेल. तसेच पर्यटकांना विशेष डिनर दिले जाणार आहे. शेफ रसमस मंक यांनी त्यासाठी विशेष मेन्यू तयार केला असून हा मेन्यू अंतराळ थीमवर आधारित असेल, हे विशेष!

Back to top button