‘सोने’ शोधणे जीवावर बेतले..! टांझानियात खाण कोसळून २२ जणांचा मृत्‍यू | पुढारी

'सोने' शोधणे जीवावर बेतले..! टांझानियात खाण कोसळून २२ जणांचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टांझानियात अवैध सोन्याच्या खाणी काेसळून २२ जणांचा मृत्‍यू झाला आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना शनिवारी ( दि.१३) पहाटे उत्तर टांझानियामधील सिमीयू प्रदेशात घडली. ( Collapse of gold mine in Tanzania kills 22 )

मुसळधार पावसानंतरही कामगारांनी खाणीत खोदकाम सुरुच ठेवले. अचानक खाण कोसळली. यामध्‍ये २४ ते ३८ वयोगटातील काही जण अडकल्‍याची माहिती प्रशासनाला कळविण्‍यात आली. आतापर्यंत २२ मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरु आहे, अशी माहिती बरियाडी जिल्हा आयुक्त सायमन सिमलेंगा यांनी ‘रॉयटर्स’ला दिली. ( Collapse of gold mine in Tanzania kills 22 )

सिमीयू प्रदेशात एका कंपनीने दोन ते तीन आठवड्यांपूर्वी खनिजांनी समृद्ध असलेले क्षेत्र शोधले होते. मात्र सरकारने खाणकामास परवानी देण्‍यापूर्वीच काम सुरु करण्‍यात आले. प्रादेशिक खाण अधिकार्‍यांनी खाणकाम थांबवले होते. तरीही पुन्‍हा ते बेकायदेशीररीत्‍या सुरु होते, असे प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

टांझानिया सरकारने लहान खाण कामगारांसाठी सुरक्षितता सुधारण्यासाठी अनेक वर्षे काम केले आहे; परंतु दक्षिण आफ्रिका, घाना आणि माली नंतर आफ्रिकेतील चौथ्या क्रमांकाचे सोने उत्पादक असलेल्या टांझानियामध्ये असुरक्षित आणि अनियंत्रित बेकायदेशीर खाण अजूनही होत असल्‍याचे या दुघटनेमुळे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button