Delhi Cold Wave :दिल्ली, एनसीआरमध्ये दाट धुके : रेल्वे गाड्या उशिरा, विमानांची उड्डाणे रद्द | पुढारी

Delhi Cold Wave :दिल्ली, एनसीआरमध्ये दाट धुके : रेल्वे गाड्या उशिरा, विमानांची उड्डाणे रद्द

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सध्या संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची कमी झाली आहे. एकीकडे रस्त्यांवरून वाहने संथ गतीने जात आहेत, तर दुसरीकडे धुक्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर अनेक विमानांची उड्डाणे उशिराने सुरू आहेत.दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवरही दिसून आला. Delhi Cold Wave

भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता जयंती एक्सप्रेस, दरभंगा नवी दिल्ली स्पेशल, गोरखधाम एक्सप्रेस, भुवनेश्वर स्पेशल, केरळ एक्सप्रेस, मगध एक्सप्रेस, मालवा एक्सप्रेस आणि श्रमजीवी एक्सप्रेस यासह २२ गाड्या उशिराने धावल्या. Delhi Cold Wave

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारीही थंडीचा कहर कायम होता. रविवारी कमाल आणि किमान तापमान १९ आणि ४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान खात्याने म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील अनेक भागात ३० ते ३१ डिसेंबरपासून कडाक्याच्या थंडीची लाट कायम आहे. धुक्याने उत्तर भारतातील गंगेचा खोरा झाकून गेला आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत कमी झाली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button