Army Act : पाक लष्कर इम्रान खानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत | पुढारी

Army Act : पाक लष्कर इम्रान खानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी भ्रष्टाचार प्रकरणी अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर दुसरीकडे, पाक लष्कराने इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पाक लष्कर इम्रान खानविरोधात आर्मी अॅक्ट (Army Act)  आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टचा वापर करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या कायद्यात मृत्युदंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

Army Act : इम्रान खानविरोधात पाक लष्कराची कठोर भूमिका

आर्मी अॅक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट लागू करण्याचा लष्कराचा निर्णय ही एक गंभीर तरतूद आहे. ज्यामध्ये इम्रान खान, त्यांच्या पक्षाचे नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांवर मृत्युदंड किंवा जन्मठेपेच्या शिक्षेचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

आर्मी आणि ऑफिशियल सिक्रेट्स कायदा म्हणजे काय ?

पाकिस्तान आर्मी कायदा सेवारत अधिकाऱ्यांना लागू होतो. ज्यांच्यावर संस्थेच्या अंतर्गत चौकशी, चाचणी आणि शिक्षा प्रणालीद्वारे खटला चालवला जातो. ज्यामध्ये दोषी आढळल्यास, एखाद्या अधिकाऱ्याला कोर्ट मार्शल आणि अपमानास्पद मार्गाने सेवेतून मुक्त केले जाते. ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट आणि त्याची कलमे देशद्रोह, हेरगिरी आणि गुप्तचर माहिती गोळा करण्याशी संबंधित आहेत.

इम्रानला काय शिक्षा होऊ शकते?

पाकिस्तानच्या मीडियानुसार इम्रान खान यांच्यावर आर्मी अॅक्टच्या कलम ५९ आणि ६० अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी सिमरी न्यायालयात त्यांच्याविरोधात सुनावणी होणार आहे. या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्यास इम्रानला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. कलम ५९ अन्वये दोषी आढळल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा वापर दिवाणी गुन्ह्यांसाठी केला जातो.

Army Act : अधिकृत गुप्त कायदा

ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट 1923 च्या कलम 3 मध्ये हेरगिरीसाठी 14 वर्षांची तरतूद आहे. हा कायदा देखील धोकादायक आहे कारण त्याखालील कारवाईसाठी फारसे पुरावे लागत नाहीत. या प्रकरणात केवळ परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यास किंवा गुन्हा केलेल्या व्यक्तीचे वर्तन देशविरोधी असल्याचे सिद्ध झाले, तर शिक्षाही होऊ शकते.

आर्मी कायदा

आर्मी अॅक्टच्या क्लॉज डी मधील पोटकलम 1 हा कायदा आणखी धोकादायक आहे. यानुसार, जर कोणी पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरू केले, शस्त्र हाती घेतले किंवा सुरक्षा दलांवर हल्ला केला, तर त्याच्यावर या उपकलमाअंतर्गत कारवाई केली जाते. या कायद्यानुसार बेकायदेशीर कृत्यांसाठी परदेशी किंवा स्थानिक स्त्रोतांकडून निधी घेणे किंवा देणे हे दोन्हीही गुन्हा आहे. तसे झाल्यास या कायद्यान्वये खटला चालवला जाईल.

दरम्यान, पाकिस्तान आर्मी अॅक्ट पाकिस्तानी लष्कराला मनमानी करण्याचा अधिकार देतो. या कायद्याचा वापर अनेक भारतीयांच्या विरोधात करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button