पुढारी ऑनलाईन डेस्क : Imran Khan Bail : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना शुक्रवारी (१२ मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हायकोर्टाने त्यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांना पुन्हा अटक करण्याची तयारी सुरू असून पंजाब पोलिसांचे डीआयजी 10 प्रकरणांमध्ये वॉरंट घेऊन उच्च न्यायालयाबाहेर पोहोचले आहेत.
इम्रान खान यांच्या खटल्याची सुनावणी कोर्ट रूम नंबर 3 मध्ये झाली. यावेळी कोर्टाच्या बाहेर पीटीआय समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला. इम्रान खान यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ उपस्थित होते. (Imran Khan Bail)
सुनावणीपूर्वी इम्रान खान पोलिस लाईन्समध्ये हजर होते. त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत इस्लामाबाद न्यायालयात नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी इस्लामाबादचा श्रीनगर महामार्ग बंद केला होता. इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
यापूर्वी इम्रान खान यांना मंगळवारी (9 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर पाकिस्तानात खान यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शनांना सुरुवात केली. संपूर्ण देशात आगडोंब उसळला. पीटीआय कार्यकर्त्यांनी देशाच्या विविध भागात जाळपोळ केली. यानंतर काल, गुरुवारी, 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. (Imran Khan Bail)
अल-कादिर ट्रस्ट खटल्याच्या सुनावणीदरम्यान इम्रान खान म्हणाले की, 'काहीही झाले तरी देश सोडणार नाही. हा माझा देश आहे, या देशाची जनता माझी आहे.'